देशाची भावी पिढी घडविण्यात अंगणवाडी ही संस्था मोलाचं योगदान देते आहे. बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचं काम अंगणवाड्या करीत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत बालकांना पुरक पोषण आहार, लसीकरण, मातांना आहार व आरोग्य मार्गदर्शन, संदर्भ आरोग्य सेवा, पूर्व शालेय शिक्षण उपक्रम, आरोग्य तपासणी या सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. योजनेअंतर्गत पूर्व शालेय शिक्षण उपक्रम 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रामार्फत प्रकल्प पद्धतीनुसार शिक्षण देण्यात येते.
सद्यस्थितीला पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 21 प्रकल्प कार्यरत असून त्यामध्ये नियमित 4 हजार 147 अंगणवाडी व 476 मिनी असे एकुण 4 हजार 623 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. त्याचे सनियंत्रण 21 बाल विकास प्रकल्प अधिकारी व 164 पर्यवेक्षिकांमार्फत केले जाते.
बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडीचे महत्व लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत सन 2019-2020 मध्ये जिल्हा नियोजन समितीमार्फत अंगणवाडी बांधकामासाठी 20 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला. त्यामधून 235 नवीन अंगणवाडी इमारत बांधकामांना (प्रति अंगणवाडी इमारत 8 लाख 50 हजार प्रमाणे) मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच यापैकी 110 अंगणवाडी इमारत बांधकाम पुर्ण झालेले असून उर्वरीत 122 कामे सुरू आहेत.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत सन 2020-2021 साठी जिल्हा नियोजन समिती कडून सुधारित 22 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामधून 258 अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकंदरीत 4 हजार 623 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून 3 हजार 467 अंगणवाडी केंद्रांना स्वतःच्या इमारती आहेत व उर्वरीत 1 हजार 156 अंगणवाडी केंद्रे ही प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत इमारती, समाजमंदीर व इतर ठिकाणी भरत आहेत. 1 हजार 156 पैकी 572 ठिकाणी अंगणवाडी इमारती मंजूर व कामे चालू आहेत.
अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन आदर्श अंगणवाडी तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेने अंगणवाडी सक्षमीकरण अभियान राबविले आहे. अभियानाअंतर्गत जिल्हयातील 4 हजार 621 अंगणवाडयांपैकी 2 हजार 136 अंगणवाडयांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात यश आले आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत बाधंकाम पूर्ण झालेल्या 3 हजार 402 अंगणवाड्या असून एकूण 525 अंगणवाड्याना मंजुरी व निधी प्राप्त आहे. 350 शौचालयाचे बांधकाम आणि 1 हजार 117 अंगणवाडीचे किरकोळ दुरुस्ती कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. अंगणवाडीकरीता सर्व जागा उपलब्ध असलेल्या अंगणवाड्यांना पक्क्या इमारती उपलब्ध करुन देण्यात जिल्हा परिषदेस यश आले आहे. यामुळे पुणे जिल्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त स्वतंत्र पक्क्या अंगणवाडी इमारती असलेला जिल्हा ठरला आहे.
माहे ऑगस्ट 2020 मध्ये कुपोषण मुक्ती अभियांनांतर्गत 142 अतितीव्र कुपोषित व 1 हजार 12 मध्ये कुपोषित असे एकुण 1 हजार 154 बालकांना जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, दानशूर व्यक्ती, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांना दत्तक देवून बालकांना 50 दिवसाकरीता अमायलेजयुक्त आहार, गुळ शेंगदाणा लाडु, खजुर लाडु व फळे इत्यादी देण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून 61 सॅम बालकांमध्ये सुधारणा झाली व 445 मॅम अशा एकूण 506 बालकांमध्ये सुधारणा झाली आहे.
मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरविण्यात येत आहेत. शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागात प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे ‘सक्षम महिला, सदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र’ हे ध्येय पूर्ण होण्यास मदत होत आहे.
शब्दांकन:- जिल्हा माहिती कार्यालय पुणे