केंद्रीय अर्थमंत्री राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ! ; भाजपचे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडेपुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला भेट देणार असून, त्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संघटनात्मक बैठकाही त्या घेणार असून यानिमित्ताने भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच शिरूर मतदार संघातही आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह या ही दौरा करणार आहेत.

सीतारामन १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान भाजपच्या देशभरातील ‘प्रवास’ मोहिमेचा एक भाग म्हणून बारामती शहर आणि लोकसभा मतदारसंघांतर्गत इतर विधानसभा क्षेत्रांना भेट देतील, असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भगडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

भाजपने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी १४४ लोकसभा मतदारसंघात  संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

१४४ मतदारसंघांपैकी, भाजपने महाराष्ट्रातील १६ लोकसभेच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी दोन जागा पुणे जिल्हातील बारामती आणि शिरूर या आहेत.

या मोहिमेसाठी भाजपने केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेत्याला ‘प्रवास मंत्री’  म्हणून नियुक्त केले आहे.

डॉ. निर्मला सीतारामन १५ ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये दाखल होतील. खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर तालुक्यांचा त्या आढावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर त्या बैठक घेणार आहेत. धायरी येथील एका मंगल कार्यालयात त्या खडकवासला मतदारसंघाअंतर्गत बैठक घेतील, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. सीतारामन यांच्यासोबतच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह याच काळात शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. शिरूरचे लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत.

Source link

Leave a Reply