संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवारांचं मौन का? पत्रकाराच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले… | Uddhav Thackeray comment on question about silence of Sharad Pawar after Sanjay Raut arrest pbs 91शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या. तसेच राऊतांवरील ईडीची कारवाई म्हणजे केंद्रीय तपास संस्थांचा राजकीय सुडासाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सार्वजनिक प्रतिक्रिया आली नाही. यावरूच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

“संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. यातून संजय राऊतांना एकटं पाडलं जातंय अशी चर्चा आहे. यावर काय प्रतिक्रिया द्याल,” असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही बोला ना, मला या फालतू प्रश्नांना उत्तरं द्यायची नाहीत. कारण मी संजय राऊत यांच्या घरी जाऊन आलो. मी पुन्हा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत.”

“संजय राऊत एक कट्टर शिवसैनिक आहे”

“संजय माझा जुना मित्र आहे आणि म्हणूनच त्याला मी अरेतुरे करतोय. तो एक कट्टर शिवसैनिक आहे. त्याने या दंडेलशाहीविरोधात न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी टाकली आहे,” असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा : संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीनंतर भावाची पहिली प्रतिक्रिया, सुनिल राऊत म्हणाले…

“नड्डांचं वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं”

उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे या भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, “जे. पी. नड्डा यांचं भाषण ऐकलं. त्यात ते म्हणत आहेत की लोकं २०-३० वर्षे इतर पक्षात काम करून भाजपात येतात. म्हणजे इथं यांचं कर्तुत्व शून्य आहे. आता यांच्याकडे काहीच आचार-विचार नाही. भाजपात लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे.”

हेही वाचा : ईडी कार्यालयात जाताना संजय राऊत अचानक मागे आले आणि म्हणाले, “पेढे वाटा…”

“शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा”

“महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा. राष्ट्रवादी कुंटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपाला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपाचा वंश कोठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तेच म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर मग भाजपाचा वंश नेमका कोणता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

हेही वाचा : ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी माझं बलिदान…”

“आजचं राजकारण अत्यंत निर्घृण आणि घृणास्पद”

“आजचं राजकारण अत्यंत निर्घृण आणि घृणास्पद आहे. त्यांच्यासोबत येतील ते आपले हे राजकारणातलं समजू शकतो. मात्र, जे आपले गुलाम होतील ते काहीकाळ आपले आणि त्यांचं काम संपलं की ते गुलाम जातील. यातून त्यांनी गुलामगिरीकडे जाण्याची दिशा ठरवली आहे. त्याचा सर्वांनी प्रत्येक पातळीवर विरोध करायला हवा,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.

“संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे”

यावेळी संजय राऊतांवरही उद्धव ठाकरे बोलले. ते म्हणाले, “संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे. तुमच्याकडे बळ आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवत असाल तर दिवस कायम राहत नाहीत. दिवस फिरतील तेव्हा नड्डा काय करणार? संजय राऊत यांचा गुन्हा काय आहे? ते निर्भिड पत्रकार आहेत. ते मरेन पण शरण जाणार नाही असं म्हटलेत.”

जे. पी. नड्डा नेमकं काय म्हणाले होते?

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचाही उल्लेख केला.Source link

Leave a Reply