Headlines

हरिनाम सप्ताह की राजकारण?

[ad_1]

लक्ष्मण राऊत

जालना : वारकरी संप्रदायाच्या हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून एखाद्या राजकीय पक्षाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचार करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता जालना जिल्ह्यात उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हरिनाम सप्ताहाच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून आपल्यामुळे झालेली विकासकामे त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भलामण करणारी वक्तव्ये केल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे.

भाजपकडून चार वेळेस विधानसभेवर निवडून आलेले आणि ग्रामीण भागात तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे असणारे लोणीकर हरिनाम सप्ताह असो की अन्य धार्मिक कार्यक्रम असो, त्यामध्ये उत्साहाने सहभागी होत असतात. अलीकडेच त्यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातील पेवा गावातील हरिनाम सप्ताहास भेट देऊन तेथे भाषण करताना आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

लोणीकर म्हणाले, पाणीपुरवठामंत्री असताना राज्यातील १८ हजार गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आपण केला. पेवा आणि मंठा तालुक्यातील ९५ गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी योजना आखली आणि ही योजना येत्या सहा महिन्यांत कार्यान्वित होणार आहे. मतदारसंघातील २०० गावांत मंदिरांसमोर सभामंडप बांधले. तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून दैठणा येथे पावणेदोन कोटींचा निधी देऊन परिसर विकसित केला. इतरही अनेक देवस्थानांचा या योजनेत समावेश केला. साधू-संतांचे आशीर्वाद असल्याने पुन्हा आपणास मंत्रीपदाची संधी मिळाल्यास सर्वात प्रथम पेवा गावात सभामंडप उभारण्यासाठी पाच-पन्नास लाख रुपये देईन! ईश्वरी सेवेला वाहून घेतल्यानेच आपण संत-सज्जनांच्या सहवासात असल्याने हरिपाठाची आपणास आवड असून ३२ अभंग पाठ आहेत. कधीही कुणाला वाईट मार्गाला लावण्यासाठी आपण राजकारणाचा वापर केलेला नाही.

 सध्या परतूर-मंठा तालुक्यांत रोज १०० भंडारे आणि धार्मिक कार्यक्रम होतात. लोक प्रेमाने बोलावतात म्हणून तेथे जावे लागते, असे सांगून लोणीकर म्हणाले, आपल्या देशासारखी संस्कृती जगात कुठेही नाही. ऑस्ट्रेलिया, मलेशिया, बीजिंग, हाँगकाँग, श्रीलंका इ्त्यादी अनेक ठिकाणी आपण जाऊन आलो, परंतु तेथे आईला आई म्हणत नाही. भजन, कीर्तन, प्रवचन, रामायण यावर आपला देश आणि संस्कृती तरलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशास आपणास जगातील महासत्ता करावयाचे आहे.

वारकरी संप्रदायाचे कीर्तन, प्रवचन त्याचप्रमाणे भागवत आणि अन्य धार्मिक तसेच आध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या भाविकांमध्ये सर्वपक्षीय जनता असते. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहताना पक्षीय भावना बाजूला ठेवावी अशी अपेक्षा असते. अशा व्यासपीठांवर पक्षीय किंवा प्रचारकी थाटाची भाषणे झाली तर भाविकांनाही ते आवडत नसते. महत्त्वाचे म्हणजे एखाद्या महाराजाचे कीर्तन सुरू होण्यापूर्वी किंवा ते थांबवून भाषण करण्याचा मोह पुढाऱ्यांनी टाळला पाहिजे.

 – राजेश राठोड, आमदार (काँग्रेस)

राम मंदिर बांधकामास पुढाकार घेतल्यामुळे देशातील साधू-संतांच्या हृदयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान आहे. त्यामुळे कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख करण्यात वावगे काय आहे? बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या राज्यातील एका वरिष्ठ नेत्याच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनासाठी एका महाराजांना आमंत्रण दिले होते; परंतु त्या महाराजांनी मात्र स्पष्टच सांगितले की, मला एक लाख द्या की दहा लाख रुपये द्या, कीर्तनात मी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख टाळणार नाही.

– बबनराव लोणीकर, भाजप आमदार, परतूर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *