sugar crushing season will started from 15th october in maharashtra cm eknath shinde zws 70



मुंबई : यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कुणी साखर कारखाना सुरू केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उसाचे क्षेत्र यंदा वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

यंदाच्या हंगामासाठी सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर उसाची लागवड आहे. राज्यात ऊसलागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टरने वाढले आहे.

यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

राज्याने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन करून उत्तर प्रदेशला मागे टाकले. यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस चालेल, अशी अपेक्षा आहे. यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी प्रारंभिक १०.२५ टक्के उताऱ्यासाठी प्रति मेट्रिक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

भारताने ब्राझिलला मागे टाकले.. सन २०२१-२२मध्ये भारताने साखर उत्पादनात ब्राझिलला मागे टाकत जगात प्रथम क्रमांक पटकावला. देशात सध्या ६० लाख मेट्रिक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रिक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन असेल.



Source link

Leave a Reply