Headlines

दफनभूमीसाठी जागा द्या ; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मृतदेहावर करणार अंत्यसंस्कार

बार्शी – गावात कोणीही मृत झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोणतीही पूर्वकल्पना न देता तो मृतदेह दफन करण्यात येईल. असा इशारा तांदुळवाडी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

तांदुळवाडी गाव बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव या मध्यम लघु प्रकल्पामुळे बाधित झालेले गाव आहे. तांदळवाडी गावाच्या पुनवर्सन वसाहतीत गावठाण मध्ये भूसंपादन होऊ सुमारे वीस वर्ष होऊनही दफनभूमीची जागा मिळालेली नाही. दफन भूमीची सुविधा ही अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य अशी गरज आहे. मात्र सध्या गावठाणात दफनभूमीची जागा उपलब्ध नाही.

पुनर्वसन विभागाने नकाशा बनवताना चुकीचा बनवला आहे. नकाशा मध्ये काही जागा वन विभागाची आणि शेतकऱ्यांची आहे. ज्या शेतकऱ्यांची तिथं जागा आहे ते न्यायालयात गेलेले आहेत. आमची मागणी आहे की नकाशा दुरुस्त करावा किंवा दफनभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी व दफनभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा. – राजेंद्र गरड , सरपंच तांदुळवाडी

यापूर्वी 25 ऑगस्ट 2019 रोजी तांदुळवाडी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह दफन करण्यास ग्रामस्थ चालले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने दफनभूमीसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे नाईलाजाने यापुढे गावात जर कोणी व्यक्ती मृत झाली तर त्याचा दफनविधी हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केला जाईल असा इशारा तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर , तहसीलदार बार्शी ,बार्शी व पांगरी पोलिस स्टेशन यांनाही देण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र गरड , हारून शेख , मुजाहिद शेख , ताजुद्दीन शेख उमराव शेख , शरीफ शेख , आदम शेख , मलीक मुजावर , अस्लम शेख आदी लोकं उपस्थित होते.

कृष्णा विकास खोरे , जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर, नगररचनाकार सोलापूर यांच्या भोंगळ कारभारामुळे दफनभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. – विकास गरड , ग्रामस्थ तांदुळवाडी

मागिल २० वर्षापासून मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनवर्सन अधिकारी एक जागा दाखवतात. माञ प्रत्यक्षात त्या जागेचा उतारा एका शेतकऱ्याच्या नावाने निघतो आहे. त्या शेतकऱ्याला प्रशासनाने अद्याप पर्यंत कोणताही मोबदला दिला नसल्याचे त्यांचे म्हणणे असुन , यासंदर्भात त्या शेतकऱ्याने न्यायालयात दावा केला आहे. प्रशासनाने तात्काळ दफनभूमीसाठी जागा उपलबध करून द्यावी, अशी आमची मागणी आहे. – हारून शेख ,ग्रामस्थ तांदुळवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *