Headlines

shivsena vijay shivtare mocks sanjay raut targets uddhav thackeray

[ad_1]

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतल्याच काही गटांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक नेते, माजी आमदार संजय राऊतांवर टीका करत आहेत. शिवसेनेतल्या बंडाळीला संजय राऊतच जबाबदार असल्याची टीका अनेकजण करत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले असताना आता शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी आमदार विजय शिवतारे यांनी टीव्ही ९ शी बोलताना संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, “मी २९ जूनलाच शिंदेंसोबत जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, माझी काय हकालपट्टी करणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

“…याच कारणासाठी शिंदेंसोबत गेलो”

शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर शिवतारेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “२९ जूनला पत्रकार परिषद घेऊन पुण्यात माध्यमांसमोर मी माझी भूमिका मांडली होती. त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं की महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फारकत घ्यावी, सगळं ठीक होईल. शिंदेंचीही भूमिका हीच होती. याच कारणासाठी एकनाथ शिंदेंसोबत गेलो. पण उद्धव ठाकरे हे करायला तयार नव्हते. २९ जूनलाच मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. मीच आधी शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. माझी काय हकालपट्टी करणार? हे का करावं लागतं हा प्रश्न आहे. हे फक्त राजकारण नाहीये”, असं शिवतारे म्हणाले आहेत.

“ही काय भानामती आहे? हिप्नॉटिजम आहे का?”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांमुळे हे सगळं घडल्याचं शिवतारे म्हणाले. “संजय राऊतांनीच हे सगळं घडवून आणलंय. संजय राऊतांची निष्ठा शिवसेनेशी किती आहे आणि शरद पवारांशी किती आहे हे महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. पण आख्ख्या महाराष्ट्राला जे कळतंय, ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना का कळत नाहीये? कालही उद्धव ठाकरे म्हणाले की खालच्या पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या. एवढं मोठं नुकसान पक्षाचं झाल्यानंतरही हे होतंय. हे काय गारूड आहे? भानामती आहे की काय? हिप्नॉटिजम आहे की काय? अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागले आहेत”, असं शिवतारे म्हणाले.

त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या…”

“वैद्यकीय क्षेत्राकत स्किझोफ्रेनिया (दुभंगलेलं व्यक्तिमत्व) नावाचा एक रोग आहे. अशा माणसाला बाकीचे काही रोग नसतात. बहुतेक हा रोग हुशार माणसांनाच होतो. ही माणसं अतीविचाराच्या गर्तेत जातात आणि तिथे पाण्यात डुंबून जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे भास त्यांना होत असतात”, अशा शब्दांत विजय शिवतारेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊतांना भास झाल्याचा टोला!

“गोव्यात आमच्याशिवाय सरकार होणार नाही, हा भास त्यांना झाला. आदित्य ठाकरेंना घेऊन गेले आणि तिकडे तमाशा झाला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की यांची लढाई आमच्याशी नसून नोटाशी आहे. खरंच नोटापेक्षा कमी मतं शिवसेनेला मिळाली. ही नामुष्की आहे. यांना दुसरा भास झाला की उत्तर प्रदेशात आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन योगी सरकारला नमवू शकतो. तिथे १३९ उमेदवार उभे केले. १०० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना तिसरा भास झाला की एक ना एक दिवस आम्ही उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू. आता याला काय म्हणायचं? चुकीचे विचार प्रखरपणे बिंबवण्यातून हे सगळं झालंय की काय माहीत नाही”, असं शिवतारे म्हणाले.

शिवतारेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

“मी शिंदेंसोबत जात असल्याचं जाहीर केल्यानंतर मला साधा फोनही उद्धव ठाकरेंनी केला नाही. मी त्यांना अडीच वर्षात अनेक पत्र लिहिली. भेटीची वेळ मागितली. पण काहीही झालं नाही. आता तर मी जाहीर केल्यानंतर अजिबात फोन वगैरे नाही. पण एक सांगेन. ही तर सुरुवात आहे. आख्ख्या महाराष्ट्रातून, जिल्ह्याजिल्ह्यातून काम करणारे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदेंसोबत असतील”, असा इशारा शिवतारेंनी यावेळी दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *