shivsena aaditya thackeray mocks cm eknath shinde devendra fadnavisपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि १०० रुपयांत शिधावाटप योजनेची अंमलबजावणी या मुद्द्यांवरून सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोच करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, दिवाळीच्या निमित्ताने दिला जाणारा १०० रुपयांतील शिधा सगळ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी हजेरी लावलेल्या आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर सडकून टीका केली. “परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो की ओला दुष्काळ जाहीर करावा. आत्ताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा सरकारकडून फक्त घोषणा झाली आहे. पुढे त्यावर काही झालं नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे स्वत: बांधावर जाणार आहेत आणि काही शेतकरी बांधवांचीही भेट घेणार आहेत”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याची माहिती दिली.

“आता वेळ आली आहे की आपण..”

दरम्यान, महत्त्वाच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाय करण्याची वेळ आल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. ” शहरी आणि ग्रामीण भागातील नुकसान पावसामुळे वाढत आहे. तरीदेखील याच्याकडे कुणाचं लक्ष आहे का? तातडीने यावर मदत करणं आवश्यक आहे. यावर दीर्घकालीन पावलं उचलण्यावर अजून कुणीही चर्चा करत नाहीये. आता वेळ आली आहे की आपण यावर चर्चा करणं सुरू करायला हवं”, असं त्यांनी नमूद केलं.

जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी? बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणतात, “त्यांचा शिवसेनेशी…!”

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना टोला!

यावेळी आदित्य ठाकरेंनी बोलताना राज्यातील उद्योग बाहेर जात असल्यावरूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. “वेगवेगळ्या राज्यांमधून आपल्याकडे मुख्यमंत्री येत आहेत. त्यांच्या राज्यांमधली औद्योगिक धोरणं सांगतायत. अनेकदा आपल्याकडचे उद्योगही घेऊन जातात. पण हे होत असताना कुठेही आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेल्याचं दिसत नाहीये”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“आपले दोनपैकी जे खरे मुख्यमंत्री असतील…”

“महाविकास आघाडीच्या काळात आम्ही दावोसला गेलो, तेव्हा ८० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली. त्यानंतर सरकार पाडलं गेलं. वेदांत फॉक्सकॉन, बलट्रक पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प राज्यातून निघून गेले. आता वेगवेगळ्या राज्यातून मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन सादरीकरण करत आहेत. पण अजूनही आपले दोनपैकी जे कुणी खरे मुख्यमंत्री असतील, त्यांचं उत्सव मंडळं, १२-१ वाजेपर्यंत उत्सवाला परवानग्या हेच सगळं चालू आहे. कुठेही महिला, बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांसाठी ते बोलत नाहीयेत”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.Source link

Leave a Reply