Headlines

सांगलीत पोलिसांचा धाक कमी?

[ad_1]

दिगंबर शिंदे, लोकसत्ता  

सांगली : जिल्हा पोलीस मुख्यालयातील वाहतूक बगिचेमध्ये लावण्यात आलेल्या दोन चंदन झाडांची चोरी परवा मध्यरात्री झाली. शहरात दुचाकीवरून महिलांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार तर दररोज घडतच आहेत, त्यातच जेसीबीने एटीएम खणून काढून पळविण्याचा झालेला प्रयत्न अथवा शिरढोण येथे गोळीबार करून चारचाकीतून एटीएम लंपास करण्याचा प्रकार घडला असताना चार-सहा हजाराची चंदनचोरी म्हणजे किरकोळच.

जिल्ह्यात रोज कोठे ना कोठे घरफोडी, चोरी होतच असते. यात नवीन काही नाही. मात्र, घडलेल्या घटनांचा तपास ज्या गतीने व्हायला हवा त्या गतीने अपवादात्मक स्थितीतच होतो. आठवडा बाजारात तर रोज दहा-वीस भ्रमणध्वनींची चोरी होते. पोलीस यंत्रणा अशा प्रकारांना जरब बसेल असे कृत्य केल्याचे दिसत नाही. 

 पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू आहे, वेळ येताच सर्व काही हाती लागेल असे साचेबंद उत्तर जर मिळत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेची शाश्वती कायद्याच्या राज्यात कोण देणार हा प्रश्न आहे. याउलट शहरातच नव्हे तर अगदी पाच-दहा हजार लोकवस्तीच्या गावातही अवैध व्यवसायाचे पेव फुटले आहे. यातून गुन्हेगारीकरण वेगाने वाढत आहे. गेल्या आठवडय़ात सांगलीतील उप अधीक्षक कार्यालयाच्या जवळच असलेल्या कॅसिनोत दोन गटांत धुमश्चक्री झाली. संगणकासह साहित्याची मोडतोड करण्यात आली आणि विशेष म्हणजे या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नसल्याने तपास करण्याची गरजच उरली नसल्याने गुन्हेगारीचा आलेख किमान कागदोपत्री तरी वाढलेला नाही. असाच प्रकार काही महिन्यापूर्वी मिरजेत घडला होता.

म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांडाची उकल सांगली पोलिसांनी तत्परतेने केली, याबद्दल पोलीस दल अभिनंदनास पात्र आहेत, मात्र, जुगाराच्या नावाखाली सुरू असलेली लूट उघडय़ा डोळय़ांनी पाहात बसावे असा जर पोलिसांचा समज असेल तर चुकीचा आहे. वाढती गुन्हेगारी शहराच्या शांततेला बाधा आणणारी ठरण्यापूर्वीच याचा बंदोबस्त करायला हवा. यासाठी पोलिसांच्या वर्दीची भीतीऐवजी धाक वाटला पाहिजे. जिल्ह्यात खासगी सावकारी फोफावली आहे. या खासगी सावकारीला राजाश्रय असल्याने पोलीस धाडसी कारवाई करीत नाहीत. जर तक्रार दाखल झाली तरच पोलिसांचा हस्तक्षेप होतो, अन्यथा सामान्य माणसाची परवड सुरूच आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *