राज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्… | Raj Thackeray stop vehicle to help injured buffelo on road in Raigadमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे. ते रायगड दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा याचं दर्शन झालंय. राज ठाकरेंचा ताफा जात असताना रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेतील म्हैस दिसली. यानंतर राज ठाकरेंनी तातडीने ताफा थांबवत या अशक्त म्हशीवर उपचाराच्या सूचना केल्या. तसेच डॉक्टरांना काही पैसे देत या जनावराच्या उपचाराची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रस्त्यावर प्राथमिक उपचार सुरू असताना ते स्वतः घटनास्थळावरच थांबून राहिले.

नेमकं काय झालं?

राज ठाकरे कोंजाई देवी पाली दर्शनावरून परतत असताना गोंदावे गावाजवळून राज ठाकरेंचा ताफा मुंबईकडे जात होता. यावेळी रस्त्याच्या मधोमध एक म्हैस बसली होती. त्या बसलेल्या जागेवरून ती उठण्याचा प्रयत्न करत होती. ताफ्यातील पुढच्या काही गाड्या पास झाल्यानंतर राज ठाकरेंची गाडी म्हशीजवळ पोहोचली. यावेळी राज ठाकरेंच्या लक्षात आलं की, त्या म्हशीला उठता येत नाही. बहुदा तिला मार लागला असावा, असा विचार करून राज ठाकरेंनी तात्काळ आपली गाडी थांबवली. तसेच बरोबरच्या सहकाऱ्यांना परिस्थितीबद्दल माहिती घेण्यास सांगितली.

म्हशीला पाजण्यासाठी आपल्या गाडीतून पाणी बॉटल दिल्या

रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी जवळ उभ्या असलेल्या माणसाजवळ विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की, एका चारचाकी वाहनाने म्हशीला जोरदार धडक दिली. त्यात तिला जबर मार लागला आहे. बराच वेळ झाला, पण कोणी लक्ष न दिल्यामुळे तिची अशी परिस्थिती झाली आहे. हे ऐकताच राज ठाकरेंनी आपली गाडी बाजूला घेतली. गाडीतून काही पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि म्हशीला पाणी पाजण्यास सांगितलं.

म्हशीवर प्राथमिक उपचार

राज ठाकरेंनी म्हशीला उठवण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितले. उन्हाच्या तडाक्यामुळे आणि लागलेल्या मारामुळे म्हशीच्या शरीरातील शक्ती संपली होती. त्यामुळे तिला उभा राहता येत नव्हतं. त्यामुळे राज ठाकरेंनी गाडीतून शाली काढून दिल्या. या शाल त्या म्हशींवर पसरवून त्यावर पाणी मारून तिचं शरीर थंड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एवढे प्रयत्न करूनही म्हैस जागेवरून हालत नव्हती. अखेर मनसेचे कार्यकर्ते गावातील स्थानिक डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी म्हशीला इंजेक्शन, सलाईन आणि औषधं दिली. या सर्व प्रकारामुळे रस्त्यावर दुतर्फा खूप वाहतूक कोंडी झाली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या ताफ्यातील सर्व गाड्यांना बाजूला करून इतरांना रस्ता मोकळा करून दिला .

साधारण अर्धा तास म्हशीला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर डॉक्टर आणि कार्यकत्यांच्या प्रयत्नांना यश आलं. म्हशीला थोडी हालचाल करता यायला लागल्यावर राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांना एका टेम्पोतून तिला पशु वैद्यकीय दवाखान्यात नेऊन पुढील सर्व उपचार होईपर्यंत मनसे कार्यकर्त्यांना तिथे थांबण्यास सांगितले. तसेच पुढील उपचाराच्या काही सूचना देत राज ठाकरेंनी डॉक्टराना काही पैसे दिले. यानंतर राज ठाकरे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाले.

हेही वाचा : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”

म्हैशीला तात्काळ टेम्पोमधून पशु वैदकीय दवाखान्यात नेण्यात आलं. तिथे झालेल्या उपचारानंतर म्हशीची प्रकृती सुधारली आहे.Source link

Leave a Reply