Headlines

पशुपालकांवर दुहेरी संकट ; जनावरांमध्ये ‘लम्पी’ची साथ, दुधखरेदीला ग्राहकांचा नकार

[ad_1]

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी’ संसर्गजन्य त्वचा आजारामुळे पश्चिम विदर्भातील पशुपालकांवर दुहेरी संकट कोसळले. जनावरांमध्ये ‘लम्पी’ संसर्गजन्य आजाराची अचानक झपाटय़ाने वाढ झाली. बाधित जनावरांवर उपचार करून इतर जनावरांना लागण न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. दुसरीकडे दुग्धव्यवसायावर देखील ‘लम्पी’चा दुष्परिणाम झाला. ‘लम्पी’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गैरसमजातून ग्राहक गायीच्या खुल्या दुधाला नकारघंटा देत असल्याने पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

महिन्याभरापासून ‘लम्पी’ आजाराने असंख्य जनावरे बाधित होत आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांत या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. गुजरात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ‘लम्पी’ झपाटय़ाने वाढल्यानंतर त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाला. ‘लम्पी’ त्वचा रोग हा गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील ‘कॅप्रीप्लॉक्स’ या प्रवर्गात मोडतात. आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. ‘लम्पी’ या आजाराचा रोग दर हा सर्वसामान्यपणे १०-२० टक्के, तर मृत्यूदर एक-पाच टक्केपर्यंत आढळून येतो. आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन घटते. पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘लम्पी’बाधित जनावरांची संख्या अत्यंत वेगाने वाढली. हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रशासनाने गुरांचे बाजार व वाहतूक यावर बंदी आणली. तरीदेखील काही भागांत गुरांचे बाजार भरतच असल्याने ‘लम्पी’च्या संसर्गाची वाढ होत आहे. काही जनावरांचा मृत्यूदेखील झाला. त्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. बाधित पशुधनाचा उपचार, अबाधितांचे लसीकरण, जनजागृती आदी उपाययोजना पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत आहेत. मात्र अद्याप तरी ‘लम्पी’वर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

‘लम्पी’ जनावरांच्या आजारामुळे अफवांचा बाजारदेखील गरज आहे. त्याचा विपरीत परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला. गैरसमजुतीतून गायीच्या खुल्या दुधापासून ग्राहक दुरावा ठेवून आहेत. त्यामुळे विक्री न होणाऱ्या दुधाचे करायचे काय, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला. अगोदरच जनावरांमधील ‘लम्पी’ आजारामुळे पशुचालक चिंतेत असताना आता अफवांमुळे दुध विक्री होत नसल्याने त्यांना दुसऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘लम्पी’ रोग हा जनावरांपासून माणसामध्ये संक्रमित होत नसल्याने मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. तसेच बाधित गायीचे दुधदेखील सुरक्षित असून दुधामुळे या आजाराचा संसर्ग होत नाही. दूध उकळून घेतल्यावर ‘लम्पी’ आजाराचा विषाणू उच्च तापमानाला जिवंत राहात नाही. त्यामुळे या दुधापासून मानवाला कुठलाही त्रास होण्याची शक्यता नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

‘लम्पी’ आजारासंदर्भात सामाजिक माध्यमाद्वारे चुकीची माहिती पसरविल्या जात आहे. या अफवांना बळी पडून ग्राहक गायीचे खुले दुध घेत नसल्याचे चित्र दुग्धव्यवसायात दिसून येते. या अफवांवर विश्वास ठेवू नये, चुकीची माहिती पसरविण्याचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पशुसंर्वधन विभागाने दिला.

अकोल्यात ८३४ बाधित, ३५५ रोगमुक्त

अकोला जिल्ह्यामध्ये ५७ ‘इपिसेंटर’ असून ८३४ ‘लम्पी’बाधित जनावरांपैकी ३५५ जनावरे बरी झाली आहेत. ४७२ सक्रिय पशुरुग्ण आहेत. उपाचारासाठी ५७ गावांच्या पाच कि.मी. परिघामध्ये ५८ हजार २८ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. पशुसंवर्धन विभागामार्फत एक लाख ६५ हजार २०० लसीच्या मात्रा जिल्ह्यात वाटप करण्यात आल्या आहेत.

‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव न वाढण्यासाठी जनजागृती केली जात आहे. बाधित जनावरांवर उपचार व प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण केले जात आहे. गायीच्या दुधापासून मानवी आरोग्याला याचा कुठलाही धोका नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये.

डॉ. जगदीश बुकतरे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *