Headlines

आता शिंदे गटही शिवसैनिकांकडून समर्थनपत्र भरून घेणार – राठोड समर्थकांच्या यवतमाळातील बैठकीत सुतोवाच | Now the Shinde group is also going to fill the letter of support from the Shiv Sainiks amy 95

[ad_1]

यवतमाळ : शिवसेनेत आमदारांचे बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे आमदार व शिवसैनिकांकडून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून घेतले गेले. त्याच धर्तीवर आता शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या समर्थकांकडून समर्थनपत्र भरून घेण्यात येणार आहे. राठोड समर्थकांच्या शनिवारी यवतमाळात झालेल्या बैठकीत याबाबतचे स्पष्ट संकेत देण्यात आले.

संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक शिंदे गटाचे ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत आज शनिवारी यवतमाळ येथे पार पडली. यावेळी फाटक म्हणाले, लोकशाहीमध्ये जिकडे बहुमत तिकडे निवडणूक चिन्ह असे संकेत आहेत. त्यामुळे ‘धुनष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाकडेच राहणार असून याच चिन्हावर येणारी नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढणार आहोत. संजय राठोड यांच्यासोबत जिल्ह्यातील किती पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आहेत, याची चाचपणी करण्यासाठी नगरसेवक राजेंद्र फाटक आज यवतमाळात दाखल झाले होते. या चाचपणीनंतर शिवसेनेची विद्यमान जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून शिंदे समर्थकांमधूनच नवीन कार्यकारणी घोषित होणार असल्याचे फाटक यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाप्रमुखांना कार्यालयासह सर्वप्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. जे सोबत असतील त्यांच्यातूनच शासनाच्या विविध महामंडळ व समितींवर निवड केली जाईल, असे ते म्हणाले. त्याची चाचपणीसुध्दा यावेळी करण्यात आली. येत्या सर्वच निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार ताकदीने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना अधिक मजबूत करण्याचा शिंदे गटाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील विभाग प्रमुख, उप तालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगर परिषद सदस्य व विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून आमदार संजय राठोड यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीरपणे सांगितले.

आ. संजय राठोड मेळावा घेणार
आ. संजय राठोड हे यवतमाळ येथे लवकरच समर्थक गट प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी सेना यांचा मोठा मेळावा घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

‘आ. संजय राठोड, खा. भावना गवळी यांची हकालपट्टी करा’
शिंदे गटात सहभागी झालेले आ. संजय राठोड आणि शिंदे गटाचे समर्थन करणाऱ्या यवतमाळच्या खा. भावना गवळी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना पक्षातून काढून टाका, अशी मागणी लावून धरली.

या बैठकीत, यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड व अन्य पदाधिकाऱ्यांनी आ. संजय राठोड व खा. भावना गवळी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आ. राठोड आणि खा. गवळी हे पक्षात नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आ. राठोड व खा. गवळी यांना आता पक्षात कोणतेही स्थान नसल्याचे सांगितले, असे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले. जिल्हाप्रमुखांनी आता पक्ष संघटन वाढीवर भर देण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्याचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी सांगितले. स्वार्थासाठी काही नेते शिवसेनेतून बाहेर पडले असतील, मात्र आम्ही तिन्ही जिल्हाप्रमुख व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक एकसंघ असल्याचे नांदेकर म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *