“नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्विकारला नाही आणि मंत्रालयात…”, अजित पवारांचा हल्लाबोल | Ajit Pawar criticize Shinde Fadnavis government over Cabinet Expansion delayविरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अद्यापही आपल्या खात्याचा कार्यभार स्विकारलेला नाही या मुद्द्यावरून जोरदार टीकास्त्र डागलं आहे. “नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्विकारलेला नाही आणि मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत, असा टोला लगावला. ते आज (१२ सप्टेंबर) विधानभवनातील वार्ताहर कक्षात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “राज्यातील विद्यमान सरकारला अडीच महिने होत आले तरी, मंत्रीमंडळाचा पूर्ण विस्तार झालेला नाही. जिल्ह्यांना पालकमंत्री नेमलेले नाहीत. नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्विकारलेला नाही. मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलींचा डोंगर साठला आहे. मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत. राजकीय सभा घेतायत.”

“मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सभेसाठी शासकीय कर्मचारी वेठीस”

“मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सभेसाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आलं आहे. अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, मदतनीसांनी राजकीय सभेला उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. अंगणवाडीतील मुलांना सोडून अंगणवाडीसेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावत असल्याने गावात मुलांची काळजी कोण घेणार? हा प्रश्न राज्याला पडला आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

“सत्तारुढ आमदारांवर गोळीबार केल्याचा आरोप”

“सत्तारुढ पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरुन हाणामारी करतायत. सत्तारुढ आमदारांवर गोळीबार केल्याचा आरोप होतोय. हे सगळं प्रगत, पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणं आहे,” अशी खंतही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

“पालकमंत्री मिळेपर्यंत जिल्हा नियोजन समितीला निधी खर्चास मनाई”

अजित पवार पुढे म्हणाले, “राज्य सरकारच्या स्थगिती आदेशामुळे विकासकामे खोळंबली आहेत. जिल्ह्यांना पालकमंत्री मिळेपर्यंत जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आर्थिक वर्षाचे सहा महिने उलटले आहेत. हिवाळी अधिवेशनापर्यंत पालकमंत्री न नेमल्यास उर्वरीत काळात निधी खर्च कसा करणार हा सुद्धा प्रश्न आहे.”

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला अंगणवाडी सेविकांना हजर राहण्याचे आदेश, अजित पवार म्हणाले, “गर्दी जमवण्यासाठी ही वेळ आली असेल तर…”

“विकासकामांवरील स्थगिती तातडीने उठवण्यात यावी”

“आदिवासी विकास विभागासह अनेक विभागांच्या योजना केंद्र पुरस्कृत असतात. त्यांना राज्याच्या हिश्श्यातील निधी वेळेत मिळाला पाहिजे. तो न मिळाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, म्हणून विकासकामांवरील स्थगिती तातडीने उठवण्यात यावी आणि विकासनिधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च व्हावा,” अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.Source link

Leave a Reply