ncp ajit pawar slams ramdas kadam eknath shinde group on aaditya thackerayसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणीचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतो. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातून बाहेर पडलेला शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला जात आहे. त्यात अनेकदा टीका करण्याची पातळी घसरल्याचंही दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारावर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतप्त झाले. शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेवर अजित पवारांनी आगपाखड केली. ते पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले होते रामदास कदम?

रामदास कदम यांनी दापोलीत घेतलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली होती. “आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ. मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते. म्हणजे खोके काय असतील ते कळेल”, असं रामदास कदम म्हणाले होते. यावरून शिवसेनेकडून आक्षेप घेतला जात असतानाच अजित पवारांनीही त्यावरून संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. “तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा. पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा नाही.महाराष्ट्राला तशी शिकवण नाही. ज्यात राज्याचं नुकसान होतंय, बेरोजगारांच्या नोकऱ्या जातायत, अशा विषयांवर बोला. वैयक्तिक टीका-टिप्पणी कशाला करता? कुणी दाढी वाढवावी, कुणी दाढी काढावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण त्यावर बोलण्याचं काय कारण आहे?” असा सवाल अजित पवारांनी केला.

“नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला

“माझी रामदास कदम यांच्याशी ओळख आहे. ते सरकारमध्ये असताना आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन जायचो. मी सरकारमध्ये असताना ते माझ्याकडे कामं घेऊन यायचे. पण या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर बोलणं ही परंपरा महाराष्ट्राची नाही. कुणाची वैयक्तिक निंदा-नालस्ती करणं बरोबर नाही. हे लोकांना आवडत नाही. मागच्या काळात काही लोकांनी मोठ्या नेत्यांची चेष्टा केली होती. सोनिया गांधींचीही काहींनी चेष्टा केली होती. ते लोकांना आवडलं नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“विरोधकांचं चुकत असेल, तर सरकारनं दाखवावं”

“तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकारचं काही चुकत असेल तर विरोधकांनी ते दाखवावं. विरोधकांचं काही चुकत असेल, तर ते सरकारनं दाखवावं. पण कुणाच्या लग्नाचं काय झालं, कुणाच्या दाढीचं काय झालं हे कशाला?” अशा शब्दांत अजित पवारांनी रामदास कदम यांच्या विधानाचा समाचार घेतला.Source link

Leave a Reply