ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; देशात १०६ टक्के पावसाचा अंदाजमोसमी पावसाच्या ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात देशात सरासरीच्या तुलनेत १०६ टक्क्यांपर्यंत पाऊस होईल, असा अंदाज सोमवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला. प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सर्वत्र या दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शेवटच्या दोन महिन्यांच्या कालावधीत देशात सरासरी ४२२.८ मिमी पावसाची शक्यता –

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी देशभरातील अंतिम टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार संपूर्ण देशात ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत ९४ ते १०६ टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. पश्चिम-मध्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होणार आहे. पूर्व-मध्य आणि ईशान्येकडील राज्यांत मात्र सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. हवामान विभागाने १९७१ ते २०२० या कालावधीत केलेल्या पावसाच्या नोंदींनुसार पावसाची सरासरी लक्षात घेऊन पावसाच्या प्रमाणाचा अंदाज देण्यात आला आहे. शेवटच्या दोन महिन्यांच्या कालावधीत देशात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची सरासरी २५४.५ मिलिमीटर राहील, असेही डॉ. महापात्रा यांनी स्पष्ट केले.

कमी दाबाच्या पट्ट्यांत वाढ –

हवामान विभागाने २०१८ ते २०२२ या कालावधीत नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार कमी दाबाच्या पट्ट्यांची देशातील संख्या वाढली आहे. मात्र, या पट्ट्यांचा दीर्घ कालावधी कमी झाल्याने कमी दिवसांत, कमी कालावधीत अधिक पाऊस होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षणही डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी नोंदिवले. पुढील दोन महिन्यांत पावसावर परिणाम करणारी ला-निना स्थिती सर्वसामान्य असणार आहे. त्यामुळे त्याचा पावसावर परिणाम जाणवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑगस्टमध्ये राज्यात पाऊस कमी? –

शेवटच्या दोन महिन्यांच्या टप्प्यात राज्यात बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता असली, तरी ऑगस्टमध्ये मात्र राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाच्या अंदाजाबाबत जाहीर केलेल्या नकाशांवरून ही बाब दिसून येते. ऑगस्टमध्ये काही भागांत पाऊस सरासरी पूर्ण करणार नाही. दक्षिण कोकणात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Source link

Leave a Reply