Headlines

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री सतेज पाटील – महासंवाद

[ad_1]

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला कोल्हापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे, जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील नागरीकांना शुभेच्छा दिल्या.

येथील छत्रपती शाहू स्टेडीयमवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरीक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपस्थित स्वातंत्र्य सैनिक-कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी गुलाब पुष्प देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 11 हजार हून अधिक बेडची उपलब्धता ठेवली आहे. यामध्ये साडेतीन हजार ऑक्सिजन बेड, साडेसातशे आयसीयू बेड तर साडेतीनशे व्हेंटीलेटर बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सीपीआर हॉस्पीटल, आयजीएम, इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय तसेच गांधीनगर, आजरा, राधानगरी, मलकापूर, मुरगूड, कोडोली, आसुर्ले-पोर्ले, आयसोलेशन हॉस्पीटल असे एकूण 15 पीएसए प्लँट व 8 एलएमओ प्लँट जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात 147 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे ते म्हणाले.

लसीकरणास प्राधान्य- पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत कोरोना लसीकरणाची मोहीम जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. आज पर्यंत जिल्ह्यातील सुमारे 30 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस तर 21 लाखाहून अधिक नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 91 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. यापुढील टप्पा बुस्टर डोसचीही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.

कोविड मृत्यू : 32 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर

कोवीडमुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना शासनाच्यावतीने प्रत्येकी 50 हजार असे एकूण 32 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले असून नातेवाईकांच्या बँक खात्यावर थेट अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

पब्लिक ॲड्रेस सिस्टीम 615 ठिकाणी कार्यान्वित

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पूर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबतचा कृती आराखडा करुन संपूर्ण राज्यासमोर पूर परिस्थितीत पूर व्यवस्थापनाचा कोल्हापूर पॅटर्न राबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची माहिती तात्काळ होण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम जिल्ह्यातील 615 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करवीर संस्थान कालावधीत 1947 च्या आदेशानुसार 5 हजार एकर लागवडीलायक क्षेत्र 1 हजार अनुसूचित जातीतील कुंटूंबाना व 10 हजार एकर पड जमीन अनुसुचित जातीच्या समाजातील कुटुंबांना वाटपासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी काही तालुक्यात झाली नसल्याने त्याचा लाभ संबंधित कुंटूंबाना झाला नव्हता. या कुटुंबांना त्यांच्या जमिनी देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

राज्यातील शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांना 5 एकर शेती योग्य जमिन वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील 13 वीर जवानांच्या कुंटूबांना जमीन देण्यात आली आहे. तसेच चंदगड तालुक्यातील मौजे-सडगुडवळे येथील 20 कुंटूबांना प्रत्येकी 5 एकर जमिनीचे शेतीयोग्य भूखंड तयार करून वाटप करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विकास कामासाठी 375 कोटी निधी प्राप्त झाला होता. या निधीतून कोविड-19 अंतर्गत उपाययोजना राबवण्यासाठी 112 कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार विविध आरोग्य सुविधांची उपलब्धता जिल्ह्यात करण्यात येत आहे.

रमाई आवास योजनेअंतर्गत 2021-22 या वर्षामध्ये नागरी क्षेत्रातील 156, ग्रामीण क्षेत्रामध्ये 325 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अभ्यासिका बांधण्यात येत आहे. तसेच शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरीता अद्ययावत डिजीटल क्लासरुम निर्माण करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखप्रमाणपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथीय व्यक्तींचे कल्याण व त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात शिवभोजन थाळी योजने अंतर्गत 44 सेंटर कार्यरत आहेत. या योजनेअंतर्गत 27 लाख शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे.

 ‘मिशन कोल्हापूर गोल्ड’उपक्रम क्रीडा क्षेत्रासाठी दिशादर्शक

आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत खेळाडूंसाठी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ या तीन गटात सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या गटा व्यतिरिक्त विशेष कौशल्य असणाऱ्या खेळाडूंसाठी मदत व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याने सुरु केलेला हा उपक्रम क्रीडा क्षेत्रासाठी दिशादर्शक असेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

जल जीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एक हजारहून अधिक योजनांसाठी 921 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबवून सन 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबास वर्षभर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पर्यटनासाठी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’

पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. ‘कोल्हापूर’ला जगाच्या नकाशावर पुढे घेऊन जाण्यासाठी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ‘टुरिझम कोल्हापूर’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन समृध्द करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आपल्या जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विमानतळावरुन आता.. मालवाहतूक सेवा

कोल्हापूर विमानतळावर अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विमानतळावर नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा, टर्मिनल इमारत आणि विमानतळ धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक 64 एकर जागेच्या हस्तांतरणाबाबत प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर विमानतळावरून माल वाहतूक सेवेसाठी भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरो ने मान्यता दिली असून यामुळे जिल्ह्याच्या शेती व शेतीपूरक व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला तसेच पर्यटनाला चालना मिळणार आहे.

औद्योगिक नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून सुमारे 37 हेक्टर जमीन नवीन उद्योजकांना देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये सुमारे 870 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे 4 हजार हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. कोल्हापूरात आणखी उद्योग येण्यासाठी तयार आहेत. त्यांच्यासाठीही जमीन व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.

इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणार

इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना, गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात दोन ते तीन टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभे राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही लवकरच पुस्तकांचे गाव उभे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाची, राज्याची तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करुया !  अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री श्री. पाटील यांनी पुनश्च: एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा  दिल्या.

00000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *