Headlines

थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा



शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा – आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी


सांगली  /विशेष प्रतिंनिधी – भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांचे सहकारी,सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड (भाऊ)यांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र च्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. काल 21 जून 2021रोजी पलूस येथे घेण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे भविष्यकालीन धोरण ठरवण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दगडू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रारंभी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन क्रांतिवीर रामचंद्र लाड तथा भाऊ हे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत . त्यामुळे कॅप्टन भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा ठराव करण्यात आला व भाऊंना शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी करण्यात आली.


त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातून आठ महिन्यात 9500 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करून पर्यावरण विषयक जनजागृती करणाऱ्या यवतमाळच्या प्रणाली चिकटेला महाराष्ट्राची ग्रेटा थुनबर्ग या विशेष पुरस्काराने सरकारने सन्मानित करावे अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.प्रणाली चिकटे या पर्यावरणप्रेमी विद्यार्थिनीने सांगली जिल्ह्याच्या प्रवासात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या नावे लावलेल्या वृक्षांनी बहरलेले बलवडी (भा) येथील क्रांती स्मृतीवन व येरळा नदीवरील वाझर बंधारा परिसराला भेट देण्याची विनंती करण्याबाबतचा ठराव या बैठकीत घेण्यात आला. 

ad.


गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव देण्याबाबत लवकरच संघटनेचे धोरण ठरविण्यात येऊन पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.महाराष्ट्राला शूरवीर क्रांतीकारकांची खूप मोठी परंपरा आहे.अशा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्यातील सिंदूर येथील रामोशी बेरड समाजातील क्रांतिकारक वीर सिंदूर लक्ष्मण यांची स्मृती शताब्दी लवकरच सुरू होत असून ती साजरी करण्याबाबत ब्रिगेडने पुढाकार घेण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी पुरोगामी चळवळी सोबतया आठवड्यात बैठक होणार आहे. संघटनेच्या वतीने  आरक्षण, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती ,रोजगार व शिक्षण या विषयावर तज्ञांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 


कोरोना कालावधीत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी सुमारे पंधरा हजार लोकांच्या पर्यंत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.यासाठी स्वत: गोळ्या उपलब्ध करून देऊन सहकार्य करणारे पलूस येथील डाँ.संतोष देसाई दांम्पत्याचा अभिनंदनाचा विशेष ठराव  करण्यात आला.सदर बैठकीला संघटनेचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे, राज्याध्यक्ष दगडू जाधव, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, राज्य संघटक पांडुरंग मदने, लक्ष्मण शिंदे ,राज्य सल्लागार बाळासाहेब खेडकर ,आदित्य माळी ,विनोद आल्हाट,सोशल मीडिया प्रमुख महेश मदने, राज्य उपाध्यक्ष सुनील दलवाई, पलूस शहर शाखेचे संजय जाधव, सोमनाथ जाधव ,गणेश शिरतोडे, रमेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मारूती शिरतोडे यांनी केले तर आभार हिम्मतराव मलमे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *