Headlines

“अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता…,” ‘सामना’मधून भाजपावर जोरदार टीका | Shivsena Uddhav Thackeray Saamana Editorial BJP Mission Mumbai Shivtirth Dusshera Melava sgy 87

[ad_1]

शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने ‘सामना’च्या संपादकीयमधून केला आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजपा आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

“पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!”, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.

काय आहे सामना संपादकीयमध्ये –

“ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपावाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपाची नीती आहे. बुलढाण्यात शिवसेनेतील दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. कोण कुठला शिंदे गट व शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर चाल करून गेले. आपापसात डोकी फुटली. एकमेकांचे कपडे फाटले. यात भाजपाचे काय गेले? गमावले ते कष्टकरी मराठी माणसाने. त्याच्या एकीची वज्रमूठ जी शिवरायांच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटली होती त्या वज्रमुठीच्या ठिकऱया करून भाजपा मजा पाहात आहे. हे फक्त बुलढाण्यातच घडले काय? हे महाराष्ट्रात जागोजाग घडवले जात आहे,” असा आरोप शिवसेनेने केला आहे.

“ट्रक, टेम्पो कमी पडतील इतकी सदस्यसंख्या वाढवा” उद्धव ठाकरेंचं आवाहन, शिंदेगटालाही लगावला टोला

“शिवसेना पह्डून त्यांनाच आपापसात झुंजवून संपवायचे. यात आजच्या बेइमानांना क्षणिक लाभ झाला, पण महाराष्ट्र फुटतोय त्याचे काय? आम्ही पाहिले कुठे तरी मंत्री दादा भुसेंच्या विरोधात घोषणा देत, त्यांना काळे झेंडे दाखवीत लोक त्यांच्यावर चाल करून गेले. या झुंजी भाजपाने लावल्या आहेत व मराठी माणूस त्यांच्या हातातील मोहरा बनला आहे. आता काय तर म्हणे त्यांचे ‘मिशन मुंबई’ सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’ आहे. मुंबईतील मराठी माणसांत फूट पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“आमचे शिवतीर्थ व त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे. आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये, 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे ‘मिशन’ सुरू आहे. काय तर म्हणे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणी घ्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे ‘कमळाबाई’ मानभावीपणे सांगते. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप; म्हणाले, “मराठा व्यक्ती मोठा…”

“दसरा मेळावा शिवसेनेचा यावर जनतेचे नाही तर देवदेवता, संत सज्जनांचेच शिक्कामोर्तब अनेकदा झाले आहे. दसरा मेळाव्यातून फुंकलेल्या रणशिंगातून ‘कमळाबाई’च्याही वैभवात भर पडली आहे. याच दसरा मेळाव्यात अनेकदा भाजपाचे ज्येष्ठ-श्रेष्ठ नेतेही अवतीर्ण झाले आहेत. दसरा मेळावा हा राजकीय जागर असतो. महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखविणारा एक सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा म्हणे आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. म्हणून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे बेइमानांचा, ‘सुरती’ बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो असतो अस्सल ज्वलंत मऱहाठी; हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर. दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱयांच्या 56 पिढय़ा खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

“सर्वोच्च न्यायालय आम्ही मॅनेज केले अशी भाषा करणारे एक वेळ भाडय़ाची गर्दी जमवून स्वतःचा जयजयकार करतीलही, पण असे हवेतले बुडबुडे येतात आणि फुटतात. इतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले व गांडुळांप्रमाणे नष्ट झाले. न्याय विकत घ्याल, पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“भारतीय जनता पक्षाला शिवतीर्थावरच मराठी लोकांत दोन तट पडून तेथेच मराठी रक्त सांडावे असे वाटते. ज्या शिवतीर्थावरून संयुक्त महाराष्ट्राच्या विराट विजयी सभेतून एकजुटीचे दर्शन घडले, ज्या शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेची आणि विजयाची ललकारी घुमली, ज्या शिवतीर्थावर मऱहाठी एकजुटीच्या लाखो वज्रमुठी आवळल्या त्या वज्रमुठी तुटाव्यात हेच भाजपचे मिशन मुंबई आहे. एका बाजूला शिंदे गटास ‘छूः छूः’ करून सोडायचे. दुसऱया बाजूला आणखी एखाद्या मऱहाठीधर्मी संघटनेस मतफुटीसाठी वापरायचे व एकदाचा शिवसेनेचा पराभव घडवून मुंबईचा घास गिळायचा हे त्यांचे मिशन असले तरी अशा महाराष्ट्रद्रोही मिशनवाल्यांशी ‘सामना’ करण्याचे सामर्थ्य शिवसेनेच्या मनगटात आहे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“यांचे मिशन कसले, तर जाती-जातीत, धर्मांत-पंथांत कांबडय़ा झुंजवायच्या. तिकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेत या उपटसुंभांनी एका विशिष्ट धर्मीयांसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याचा प्रस्ताव ठेवला व टेंडरही काढले. विरोध होताच मागे हटले. ही वेगळी शौचालय व्यवस्था उद्या मुंबई-ठाण्यातही येईल. हे महाराष्ट्रास कदापि मान्य होणार नाही. अलीकडे म्हणे ‘राजकीय’ शिवतीर्थावर भाजपावाल्यांच्या फेऱया वाढल्या आहेत. त्या काही प्रेमाचा पान्हा फुटला म्हणून नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस जितका अपशकून करता येईल तेवढा करावा यासाठीच. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. अर्थात या बेइमान बाटग्यांचा समाचार घेण्यासाठी महाराष्ट्राची जनता सक्षम आणि सामर्थ्यवान आहे,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

“शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजपा आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. गुजरातमध्ये अलीकडे मोठय़ा प्रमाणात चरस-गांज्यांचे पीक आले आहे. त्या चोरटय़ा गांजांची नशा मिशन मुंबईवाल्यांना चढली असेल तर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातच ती उतरविण्याचे बळ आई जगदंबेने महाराष्ट्रीय मनगटात दिले आहे. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *