Headlines

साडेचार हजार शब्दांचा ‘पावरी भाषाकोश’ साकार ; गुणवत्ता असूनही भाषिक अडसरामुळे शिक्षणात मागे पडू न देण्याचा संकल्प

[ad_1]

अकोला : गुणवत्ता असूनही आदिवासी विद्यार्थी केवळ भाषिक अडसरामुळे शालेय शिक्षणात मागे पडतात. हे चित्र बदलण्यासाठी सुमारे साडेचार हजार शब्दांचा समावेश असलेल्या ‘पावरी भाषाकोश’ची निर्मिती करण्यात आली आहे. या भाषाकोशामुळे पावरा समाजातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मातृभाषा, राज्यभाषा, देशभाषा अन् ज्ञानभाषा इंग्रजीतील शब्दसंग्रह उपलब्ध होणार आहे.

आमदार डॉ. संजय कुटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून व अडीच वर्षांच्या सखोल संशोधनातून ‘राइज फाउंडेशन’ने पाच भागात ‘पावरी भाषाकोश’ साकारला असून विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ७ ऑगस्टला जळगाव जामोद येथे याचे प्रकाशन होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी मातृभाषेतून हसत खेळत शिक्षण देण्यावर शासनाचा भर आहे. अकोला, अमरावती, नंदूरबार, धुळे या आदिवासीबहुल जिल्ह्यात कोरकू, भिल, पावरा, निहाल, भिलाला समाजाचे वास्तव्य आहे. या समाजातील विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगळी असल्याने मराठीतील पुस्तके त्यांच्यासाठी फारशी उपयुक्त ठरत नाहीत. मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी कार्यरत ‘राइज फाउंडेशन’ने ही बाब ओळखून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या मातृभाषेतून पुस्तके साकारण्याची कल्पना पुढे आणली. आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, अकोला येथील प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे यांच्या पुढाकारातून २०१९ मध्ये पावरा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असा कोश तयार करण्याचा निर्धार करण्यात आला. राइज फाउंडेशनचे संचालक आचार्य ऋषिकेश खिलारे, प्रकल्प समन्वयक हर्षदा लोंढे-खिलारे यांनी ४५ गावांतील ५०० पेक्षा अधिक ग्रामस्थांशी संवाद साधत अडीच वर्षे सखोल संशोधन केले. पावरी बोलींचे स्थानिक अभ्यासगट व पुणे, मुंबई, औरंगाबादेतील ११ जणांच्या भाषा समितीने या सर्व नोंदी तपासून त्यांचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांच्या भाषिक गरजांनुसार पाच भागात वर्गीकरण केले. यातूनच माझी शाळा, माझा परिसर, माझे जग, माझी संस्कृती आणि माझा अभ्यास अशा पाच खंडातील ‘पावरी भाषाकोश’ तयार झाला. सुरेख रंगसंगती, चित्रांचा चपखल वापर, सुलभ हाताळणीच्या दृष्टीने निश्चित केलेला पुस्तकांचा आकार यामुळे हा भाषाकोश विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त झाला आहे. ग्रंथाली प्रकाशनने भाषाकोश निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

यात काय? पावरी बोलीतील प्रत्येक शब्दाचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी प्रतिशब्द व त्याचा उच्चार हा भाषाकोश सांगतो. केवळ शब्दच नव्हे तर चटकन अर्थबोध व्हावा, यासाठी त्या शब्दानुसार चित्रेही आहेत. विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, सण-उत्सव, चालीरितींची ओळख व्हावी, यासाठी स्वतंत्रपणे तयार केलेला ‘माझी संस्कृती’ हा खंड हे या भाषाकोशचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ होय. पावरी बरोबर भिलाला, निहाली या भाषांचेही काम पूर्ण झाले आहे.

हुकू बाकू महोत्सवाचेही आयोजन.. विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सोहळय़ात ६ ते ८ ऑगस्टदरम्यान ‘हुकू बाकू – पश्चिम मेळघाट सांस्कृतिक मेळा’ आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी लोकसंस्कृतीची अनुभूती घेण्याची संधी देणाऱ्या या तीन दिवसीय कार्यक्रमात राज्यभरातील मान्यवर, उद्योजक, वरिष्ठ शासकीय अधिकारी, भाषा तज्ज्ञांची उपस्थिती असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *