Headlines

ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) २०२१ मार्गदर्शक सूचना जाहीर,रक्तदान शिबिर , आरोग्य शिबिर आयोजित करुन ईद साजरी करण्याचे शासनाचे आवाहन

दरवर्षीप्रमाणे यावर्षी 19 ऑक्टोंबर रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद साजरे करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने ईद-ए-मिलाद संदर्भात शासन निर्णय जारी करून ईद साधेपणाने तसेच रक्तदान आरोग्य शिबिर घेऊन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

ईद-ए-मिलाद संदर्भात जारी करण्यात आलेले नियम पुढील प्रमाणे.

कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद-ए-मिलाद
(मिलादुन नबी) जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी
दि. १९/१०/२०२१ किंवा २०/१०/२०२१ रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :

१. कोवीड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती
व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र. DMU/2020/CR.92/DaM-1.
दि. ४/६/२०१९ सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र. Corona 2021/CR.366/Arogya-5,
दि. ११/८/२०१९ तसेच आदेश क्र.- Corona 2021/C.R.366/Arogya-5, दि. २४/९/२०१९ अन्वये
” चैन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

२. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या
धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी)
शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. तथापि, मिरवणुका काढावयाच्या झाल्यास पोलीस
प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणुकीत जास्तीत जास्त ५ ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत
जास्त ५ इसमांस परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणूकांदरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक
अंतराचे (Social Distancing) पालन करण्यात यावे.

३. मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनीप्रदुषण
नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

४. मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या
नियमानुसार संबंधित महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे
अनुपालन करणे बंधनकारक राहील. सदर पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत
स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नियमांचे पालन करावे.

५. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. २४/९/२०२१ रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोर
पालन करून मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी
देण्यात येत आहे.

६. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. केबल टि.व्ही., फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.

७. सबील/पाणपोई- ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मिरवणूकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. सबील (पाणपोई बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील (पाणपोई) च्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

८. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.

९. कोविड १९ परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

१०. वरील सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासनाला असतील.

११. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे आवश्यक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *