Headlines

बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले, “गेल्या अडीच वर्षात कधीही…” | shivsena rebel MLA gulabrao patil on aaditya thackeray maharashtra visit shivsanvad yatra rmm 97

[ad_1]

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. ‘शिवसंवाद’ यात्रेच्या माध्यामातून ते महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ज्या ठिकाणी जातील, तेथून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडत आहेत. ते सातत्याने बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत आहेत. तसेच गद्दारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हानदेखील आदित्य ठाकरे करत आहेत.

त्यामुळे आता बंडखोर आमदारांनीदेखील आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बोलायला सुरुवात केली आहे. बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनीही आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणाले, “आम्ही गद्दारी केलीच नाही. आम्ही शिवसेनेचे बेंच सोडून बाहेर बसलो नाही. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत येत नाही.”

आदित्य ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल गुलाबराव पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरे आज महाराष्ट्र दौऱ्यासाठी बाहेर का पडले आहेत? गेल्या अडीच वर्षात ते कधीही शिवसेना भवनाची पायरी चढले नाहीत. आताच पळापळ का करत आहेत? यापूर्वी आमचंदेखील हेच म्हणणं होतं की तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही ३० वर्षाचे तरुण आहात. उद्धव ठाकरे यांची प्रकृती खराब असली किंवा करोनाचा काळ असला, तरी आता जसं राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरताय, तसंच फिरा असं आमचं म्हणणं होतं.”

“८० वर्षाचे शरद पवार तीन-तीन वेळा जळगाव जिल्ह्यात येतात. अजित पवार आणि धनंजय मुंडे हेही जळगाव जिल्ह्याचे दौरे करतात, पण आदित्य ठाकरे बाहेर पडत नाहीत, हे मी सभागृहात देखील मांडलं होतं” अशी टीकाही गुलाबराव पाटलांनी केली आहे.

हेही वाचा- “…त्यामुळे धनुष्यबाण आमचाच आहे” बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

“गद्दारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं” या आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, “आम्ही राजीनामा देण्याचा संबंध येतोच कुठे? आम्हाला लोकांनी धनुष्यबाणावर निवडून दिलं आहे. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे. ती शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, त्यामुळे राजीनामा देण्याचा संबंध येतोच कुठे?” असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी, अखेर मनातील खदखद आली बाहेर

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल? असा प्रश्न विचारला असतान गुलाबराव पाटील म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल? याचा कधी विचारच केला नाही. जो व्यक्ती मंत्रीपद सोडून आलाय, तो कशाला अशा गोष्टींचा विचार करेन? ८ मंत्र्यांनी राजीनामा देण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. लोकं सत्तेकडे जातात आम्ही सत्तेतून बाहेर पडलोय, मंत्रीपदं आमच्याकडे होती. लोकं साधं सरपंचपददेखील सोडत नाहीत. आम्ही कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद सोडलंय, याचाच अर्थ आम्हाला आमचा धनुष्यबाण वाचवायचा होता. शिवसेना वाचवायची होती, त्यामुळे मंत्रीपद कधी येईल? किंवा न्यायालयात काय निर्णय लागेल, याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाहीये, आम्हाला शिवसेना वाचवायची आहे” असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटलांनी दिलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *