“बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस, राष्ट्रवादी…”; शिंदे सरकार ‘बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार’ असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांचं विधान | Balasaheb Thackeray said Congress and NCP is our enemy says CM Eknath Shinde in Hingoli Rally scsg 91हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांच्या पुढाकाराने हिंगोलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. बाळासाहेबांच्या एका जुन्या भाषणाचा संदर्भ आपल्या जाहीर सभेतील भाषणात देत शिंदेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले शत्रू असल्याचं बाळासाहेब म्हणाले होते. त्यानुसारच आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहोत, असं म्हटलंय.

एकनाथ शिंदे हे हिंगोलीमधील सभेत भाषण देण्यासाठी उभे राहिले असता संजय बांगर समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी आपण सर्वांना आपल्या कामातून उत्तर देणार आहोत असं म्हटलं. “मागील महिन्याभरात आपल्या लोकांनी वेगवेगळी नावं दिली आहेत. पण आपण त्यांना कामातून उत्तर देणार आहोत. आपल्या कामातून आणि कार्यातून उत्तर देणार आहे. एवढी जमा झालेली माणसं हेच त्यांना उत्तर आहे. जिथे जिथे आम्ही जातोय तिथे हजारोच्या संख्येने लोक हसत मुखाने स्वागत करतायत. हेच त्यांना उत्तर आहे,” असं शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी राज्यामध्ये शिवसेना-भाजपा युतीचं बाळासाहेबांच्या स्वप्नातलं सरकार स्थापन झालेलं आहे, असंही म्हटलं. “२०१९ मध्ये आपण एकीकडे बाळासाहेबांचा फोटो दुसरीकडे मोदींचा फोटो लावला ना आपण? प्रचार केला. शिवसेना-भाजपा युतीसाठी मतं मागितली. महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरुन मतदान करुन १०६ भाजपाचे आणि ५६ शिवसेनेचे आमदार निवडून दिले. संपूर्ण बहुमत शिवसेना-भाजपा युतीला दिलं. का दिलं जनतेनं हे बहुमत तर या राज्यात शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हावं म्हणून. पण तसं झालं नाही. त्याच्या उलट झालं,” असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीच्या स्थापनेवर आक्षेप घेतला.

“ज्या लोकांशी आपण इतके वर्षे निवडणुकीमध्ये संघर्ष केला, ज्या लोकांनी आपलं खच्चीकरण केलं, ज्यांनी आपला पक्ष संपवण्याचा चंग बांधला अशा लोकांसोबत आपण सरकार स्थापन केलं. हे दुर्दैव होतं. बाळासाहेबांचं जाहीर भाषण आहे. त्यात ते म्हणाले होते की, काँग्रेस, राष्ट्रवादी आपले शत्रू आहेत. त्यांना कधीही जवळ करणार नाही. अशी जेव्हा जवळ करण्याची वेळ येईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांचे शब्द होते. मग आम्ही काय केलं? आम्ही बाळासाहेबांचे हेच विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना वाचवण्याचं काम करत आहोत. हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करत आहोत. मग चूक आमची की कुणाची? हे जनतेने पाहिलेलं आहे. जनतेनं याचा विचार केला. म्हणून आम्ही जिथं जातोय तिथं लोक हजारोच्या संख्येने आमचं स्वागत करताय हेच त्यांना उत्तर आहे,” असं शिंदे म्हणाले.Source link

Leave a Reply