Headlines

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन


मुंबई, दि. १४ : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी उद्योग क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांची व्यापक चळवळ अत्यंत प्रभावीपणे राज्यात राबविली जात आहे. गरिबी निर्मूलनाचे ध्येय असलेल्या या राष्ट्रीय ध्वजांकित कार्यक्रमात ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटीत केले आहे. अभियानात महिलांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यात आलेले आहे. अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला अनेक प्रकारच्या हस्तकलेतून वस्तूंची निर्मिती करतात. या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून अभियानाकडून सातत्याने प्रयत्न होत असतात.

दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रात भेटवस्तू, सुकामेवा आणि फराळाच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. या भेटवस्तू आणि साहित्य महिला बचत गटांकडून खरेदी करून या महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत मिळेल, असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे. बचत गटाच्या महिलांनी निर्मिती केलेल्या वस्तूच्या उपलब्धतेसाठी अभियानाच्या सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबईच्या कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपर्कासाठी 022-27562552, 27562554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच श्री वीरेंद्र पाटील (संपर्क क्रमांक 9890190678) यांची यासाठी समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे. वस्तूंची यादी आणि त्याबद्दल सविस्तर माहिती अभियानाच्या Maharashtra State Livelihoods Mission उमेद या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या उपलब्धतेसाठी समन्वय ठेवला जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *