“आदिलशाह, निजामशाहाच्या कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह” गिधांडांशी तुलना करत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल | uddhav thackeray on amit shah mumbai speech live rmm 97शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवाय परंपरेनुसार दसरा मेळावाही शिवतीर्थावरच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत. एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजलं, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे. विशेष म्हणजे मुंबईवरती सध्या गिधाडं फिरायला लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयाची आहे. त्यामुळे मुंबईवर लचके तोडणारी गिधाडांची अवलाद फिरायला लागली आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अमित शाहांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत आम्ही मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून आले होते. त्याच कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत. देशाचे गृहमंत्री असूनही मुंबईत येऊन ते काय बोलून गेले? तर शिवसेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहीत नाही, इकडे जमिनीतून फक्त गवताची पाती उगवत नाहीत, तर तलवारीची पातीही उगवतात. तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, पण आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आज मी ठणकावून सागतोय, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? यांच्यासाठी मुंबई ही केवळी विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. १०५ वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.Source link

Leave a Reply