Headlines

एक सच्चा साथी कॉम्रेड भगतसिंगला परिवर्तनाच्या वाटसरुणी लिहलेले पत्र

प्रिय साथी भगतसिंग यास....

                जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा मित्रा तुला. आज तू ११४ वर्षांचा झालास. “व्यक्तींना मारून त्यांचे विचार संपवता येत नाहीत.” हे तुझ वाक्य तुझ्या बाबतीत अगदी खर ठरत.आज तू जिवंत नाहीस तरीही तुझ्या विचारांतून आणि तुझ्या लिखाणातून तू नेहमी आमच्या सोबत आमचा साथी ,कॉम्रेड, आमचा दोस्त म्हणून उभा आहेस. तुझ्या विचारांना जाणून घेणार्‍या  लोकांची संख्या कमी नाही परंतु शाळांमधल्या पाठ्य-पुस्तकांमध्ये आजही तुझी ओळख सशस्त्र क्रांतिकारक म्हणूनच केली जाते. बऱ्याचवेळा तुझ्याबद्दल विचार केला जातो तेव्हा बंदूक आणि हिंसा याचाच उल्लेख होतो याच दुःख वाटत. परंतु तूच एका ठिकाणी म्हणतोस की, ” बम और पिस्तूल से क्रांती नहीं आती, क्रांती की तलवार विचारों की सान पर तेज होती हैं.”

    तुझ्या विचारांना जाणीवपूर्वक पुढे येऊ न देण्यासाठी धडपडणारे तुझी दहशतवादी , वाट चुकलेला क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतिकारक म्हणून नेहमीच बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. अगदी वयाच्या १२-१३ व्या वर्षी तू स्वातंत्र्य लढ्यात हिरहिरीने सहभागी झालास. जालियनवाला बाग हत्याकांड , रौलट कायद्यामुळे पोलिसांची वाढती दडपशाही , चौरीचौरा घटनेनंतरची शेतकऱ्यांना झालेली शिक्षा या सर्वांचा तुझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि तू त्यावेळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या असहकार आंदोलनात उतरलास. परदेशी कपड्यांची होळी आणि स्वदेशीचा स्वीकार या मोहिमेत तूच आघाडीवर होतास. 

       महाविद्यालयीन जीवनात लाला लाजपतराय यांनी लाहोर येथे सुरू केलेल्या नॅशनल कॉलेज मध्ये तू दाखल झालास. महाविद्यालयीन जीवनातही तू गाणी , नाटक आणि कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करत होतास. विद्यार्थ्यांना व तरुणांना देशातील जातीव्यवस्था , अस्पृश्यता आणि अंधश्रध्देविरोधात लढायला  शिकवून मानवता , एकता , बंधुता ही मूल्ये पटवून देत होतास. यातूनच तुला पुढे सुखदेव , बतुकेश्र्वर दत्त , भगवती चरण यांसारखे मित्र महाविद्यालयीन जीवनातून भेटले. जे अगदी शेवटपर्यंत लढ्यात तुझ्या सोबत राहिले. महाविद्यालयीन जीवनात तू वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील विषयांवर वाचन आणि लिखाण देखील केलंस.

          तुझ आयुष्य फक्त साडे तेवीस वर्षांचं. या अल्पायुष्यातच तू इंग्रज सरकारची पाळे – मुळे हलवून सोडलीस. परंतु आजही चर्चा होते ती फक्त सॉंडर्स हत्या आणि असेंबलीमधल्या बॉम्ब फेक घटनेची . त्यानंतर या घटना मागचा जो हेतू तू स्पष्ट केलास , तो कधीही समोर आणू दिला जात नाही. या घटनांनंतर जी पत्रक तुम्ही वाटली. त्या पत्रकांमध्ये तुम्ही म्हणता की, ” मानवी जीवन आम्हाला मूल्यवान वाटते. अपरिहार्य कारणांमुळे आम्हास रक्त सांडावे लागले. पण महान क्रांतीच्या यशासाठी काही व्यक्तींना बलिदान करावे लागते. भारतात क्रांती होणे अपरिहार्य आहे. क्रांती चिरायू होवो.” सभागृहात बॉम्ब फेल्यानंतर तुला नी तुझा सहकारी बटूकेश्वर दत्तला पळून जाणे सहज शक्य होते. परंतु तसे न करता तुम्ही स्वतःला अटक करून घेतली आणि न्याय व्यवस्थेच्या मदतीनेच तुमचे विचार तुमचे कार्य तुम्ही हजारो – लाखों तरुणांपर्यंत पोहोचवलेत. असेम्ब्लीमधील बॉम्ब फेकमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही . परंतु ‘बहिर्‍याना जागे करण्यासाठी धमक्याची गरज असते’ म्हणून बॉम्ब फेक केल्याचे तुम्ही स्पष्ट केले. ‘इंकलाब झिंदाबाद’ , साम्राज्यवाद मुर्दाबाद , जगातील कामगारांनो एक व्हा या घोषणांनी तुम्ही सभागृह दणाणून सोडलत.

          तुझी राजकीय कारकीर्द केवळ साडेआठ वर्षांची परंतु तुझी राजकीय प्रगल्भता , तुझा वैचारिक प्रवास पाहता माणूस थक्क होऊन जातो. स्वातंत्र्य चळवळीतले अनेक अग्रणी देशाला इंग्रजांकडून मुक्त करू पाहत होते तर त्याच ठिकाणी तू मात्र स्वातंत्र्यानंतर समाजवादी , लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष देशाची स्थापना करण्यासाठी लढत होतास. जिथे सगळी माणसं समान असतील. माणसांकडून माणसांचं शोषण होणार नाही. जात , धर्म , पंथ ,लिंग ,भाषा व प्रांत यावर आधारित भेदभाव जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत भारताला खरे स्वातंत्र्य मिळणार नाही या  भूमिकेवर तू ठाम होतास. देशाविषयी प्रचंड अभिमान आणि देशासाठी कोणताही त्याग करण्यासाठी तू तयार होतास. तू आंधळा देशभक्त किंवा क्रांतिकारक नव्हतास. तुझ्या प्रत्येक कृतीच्या मागे एक विचार होता. इंग्रजांना हाकलून भारतीयांच्या हाती सत्ता देणे एवढेच तुझे ध्येय नव्हते तर इथल्या सामान्य शेतकरी , कष्टकरी , कामगारांचा समाजवादी भारत निर्माण करणे हे तुझे अंतिम ध्येय,उद्दिष्ट होते.

            त्याकाळच्या किर्ती , अकाली , वीरअर्जुन आणि प्रताप सारख्या अनेक मासिकांमध्ये तू अगदी वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केलंस. ‘ युवक ‘ या विषयावरील लेखात तू युवकांना उद्देशून लिहितोस की , ” जगाच्या इतिहासाची पाने उघडून पहा , युवकांच्या रक्ताने लिहिलेले संदेश पानोपानी दिसतील. जगाच्या क्रांत्यांची आणि परिवर्तनाची वर्णने बघा त्याच्यात फक्त युवकच तुम्हाला भेटतील.” ‘धर्म आणि आपला स्वातंत्र्य संग्राम ‘ यावर लिहिताना तू म्हणतोस ,” ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे. मानव हा मात्र काहीच नाही. केवळ मातीचा पुतळा आहे. असे मुलांना सांगणे म्हणजे मुलांना कायमस्वरूपी कमजोर बनवणे आहे. त्यांच्या हृदयातील शक्ती नष्ट करणे आहे. ‘ विद्यार्थी आणि राजकारण ‘ यामध्ये तू विद्यार्थ्याना उद्देशून लिहितोस की,  “विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे आहे. हे आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करायला हवे. पण देशाच्या सद्य स्थितीचे ज्ञान आणि ते सुधारण्याचे उपाय यांचा विचार करण्याची क्षमता विकसित करणे याचा शिक्षणात समावेश नसेल तर अशा शिक्षणाला आम्ही कुचकामी ठरवतो.

     ‘मी नास्तिक का आहे ?’ या तुझ्या प्रसिद्ध लेखात तू लिहितोस , ” श्रद्धा  ही संकटाची व कष्टाची तीव्रता कमी करते. किंबहुना या गोष्टी ती सुखावह सुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसांना सांत्वन व बळकट आधार मिळतो. देवाशिवाय माणसाला स्वतः वरच अवलंबून राहावे लागते. वादळमध्ये फक्त स्वतःच्या  पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व जर असलाच तर तो पार वितळून जातो.” मित्रा अगदी अंतिम क्षणापर्यंत तुझी ही विज्ञाननिष्ठा तू उचलून धरलीस. उच्च नैतिकतेसाठी धार्मिकतेची गरज नसते. एवढेच नव्हे तर त्यापलीकडे गेल्यानेच सर्वोच्च मानवी मूल्ये खऱ्या अर्थाने जपता येतात. हेच तू यातून सिद्ध केलस. ” बऱ्याचदा कस होत की, जे स्त्री – पुरुष अतिशय कडक अशी देवपूजा करतात , उपवास वगैरे करतात ती माणसं म्हणजे खुप चांगली,सुसंस्कारी असतात असा समज असतो. परंतु देव – धर्म , पूजा – अर्चा यापलीकडे जाऊन जेव्हा आपण माणसांना आपल्याशी जोडून घेतो तिचं खरी मोठी माणुसकी असते हेच तुला यातून सांगायचं आहे अस मला वाटत.

       ‘ क्रांती ‘ म्हणजे काय हे स्पष्ट करताना तू लिहितोस की, ” क्रांतीसाठी रक्तसंजित युद्ध अनिवार्य नाही, तसेच त्यामध्ये व्यक्तिगत प्रतीहिंसेला कसलेही स्थान नसते.” ” क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब आणि पिस्तूल यांचा पंथ नसून आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत अमुलाग्र बदल. ” आज बरेचजण आपल्या व्हॉट्सॲप डि.पी. ला तसेच गाड्यांवर तुझा फोटो लावतात. तुझा फोटो असलेला टी शर्ट देखील घालतात. काही काही फोटोंच्या खाली तर ‘ लगता है मुझे फिरसे आणा होगा ‘ असेही लिहिलेले असते. परंतु तू नास्तिक होतास. तुझा स्वर्ग – नरक , पुनर्जन्म या सर्व कल्पनांवर कधीच विश्वास नव्हता. हे या लोकांनी कधीच अभ्यासलेल नसत. अगदी शेवटच्या क्षणी देखील हाच आपल्या आयुष्याचा अंत आहे हे तुला पक्के ठाऊक होते .परंतु आपल्या आदर्शासाठी एक क्रांतिकारक किती शौर्याने बलिदान देऊ शकतात हेच तू जगाला यातून दाखवून दिलंस.

    तूच एका ठिकाणी म्हणतोस,

“लिख रहा हुं मैं अंजाम आज , जिसका कल आगाज आएगा.

मेरे लहू का हर एक कतरा इंकलाब लाएगा.

 मैं रहू या न रहू मगर वादा हैं तुमसे मेरे बाद वतन पे मिटने वालों का सैलाब आएगा. “

        आज हजारो – लाखो तरुण तुझ्या याच विचारांनी प्रेरीत होऊन ‘हम भगतसिंग के साथी’ म्हणत देशाच्या वेगवेगळ्या भागात संघर्ष करीत आहेत. आज काळ बदलला असला आणि काम करण्याची पद्धतही बदलेली असली तरी तेव्हाचे प्रश्न आजही आणखी मोठी आव्हान घेऊन समोर उभी आहेत. आणि या आव्हानांना सामोरे जाण्याचं बळ तूच आम्हाला देतोस. अन्यायाविरुद्ध मुठ आवळुन उभ राहण्याची ताकद , संकटांना भिडण्याच बळ तूच तर आम्हाला देतोस. तूच असतोस या भयाण अंधाऱ्या रात्रीत आमची मार्गदर्शक मशाल. आणि तूच असतोस आमचा दोस्त,साथी, कॉम्रेड…..

        मित्रा पुन्हा एकदा तुला जन्मदिनाच्या शुभेच्छा…

ऐ भगतसिंग तू जिंदा है

हर एक लहू के कतरे में.!

              तुझेच  वाटसरू

                 पूजा कांबळे

                 दत्ता चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *