अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षारत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून अभिजित गौतम जाधव (वय ३० वर्षे, ) या तरुणास येथील विशेष न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ११ मे २०१८ रोजी दुपारी १ च्या सुमारास पीडित ११ वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. तिची आई मुंबईला गेली होती, तर वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते. ही संधी साधून अभिजित जाधव पीडित मुलीच्या घरी गेला आणि तेथे तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केला. या प्रकाराची माहिती मुलीने चुलतकाकीला सांगितली. काकीने मुंबईवरून आईला बोलावून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, १२ मे रोजी तिच्या आईने सावर्डे पोलीस स्थानकात घटनेची फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत भा.दं.वि. कलम ३७६ अन्वये दोषारोप पत्र सादर करण्यात आले. याप्रकरणी एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश मोमीम यांनी आरोपीला भा.दं. वि. कलम ३७६ अ/बअन्वये दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने साधी शिक्षा सुनावली. तसेच भा.द.वि.कलम ५०६ अन्वये २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

 याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील म्हणून अ‍ॅडव्होकेट पुष्पराज शेटय़े यांनी काम पाहिले. तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी याप्रकरणी तपास केला.

Source link

Leave a Reply