Headlines

शहीद जवान सुनील काळे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

 सोलापूर, दि.२४: पुलवामा येथे अतिरेक्यांशी चकमकीत  शहीद झालेले जवान सुनील काळे यांच्यावर  पानगाव ( ता. बार्शी) येथे आज सकाळी शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
अमर रहे….अमर रहे…शहीद जवान सुनील काळे अमर रहे….अशा घोषणा हजारो ग्रामस्थ देत होते. संपूर्ण गावातून शहीद जवान सुनील काळे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शूरवीराला अखेरचा सलाम देण्यासाठी आबालवृद्ध यांच्यासह सर्व ग्रामस्थ होते. प्रत्येकाचे डोळे अश्रूने भरलेले होते.


यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, पोलीस उपमहानिरीक्षक वीरेंद्र कुमार टोपो, कमांडन्ट श्री. मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सरपंच सखुबाई गुजले यांच्यासह  जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सीआरपीएफ आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी  श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बी. वाय. यादव, असिस्टंट कमांडन्ट शरद घडयाले उपस्थित होते.
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस यांच्याकडून बंदुकीच्या  फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
पालकमंत्री भरणे यांनी शहीद जवान काळे यांचे कुटुंबीय आई कुसुम, पत्नी अर्चना, थोरले बंधू नंदकुमार, मुलगा श्री आणि आयुष यांचे सांत्वन केले. राज्य शासन कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिल, असे आश्वस्त केले. काळे कुटुंबियांना राज्य शासनाची मदत लवकरात लवकर मिळवून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सीआरपीएफचे कमांडन्ट श्री. मिश्रा यांनी जवान काळे यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. जवान काळे यांच्या कुटुंबियाबाबत आम्हांला अभिमान आहे.  जवान काळे यांनी ३ जूनलाही तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. सीआरपीएफ त्यांचे मिशन पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शहीद जवान काळे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई ही करणार असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *