Headlines

मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर :- जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह आणि घर व घराच्या परिसरात अटी शर्तींच्या अधिन राहून लग्न समारंभास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत.
या आदेशात त्यांनी नमूद केलेल्या अटी पुढीलप्रमाणे –
1.लग्न समारंभाच्या ठिकाणी एकावेळी मंगल कार्यालयामधील कर्मचारी, उपस्थित सर्व व्यक्ती, बँन्ड /वादक, भटजी, डेकॉरेटर व इतर यांच्यासह एकूण संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही.
2.मास्क आणि सुरक्षित अंतराचे (social Distancing) पालन करणे बंधनकारक राहील.
3.लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुनच प्रवेश देणे आवश्यक राहील.
4.मंगल कार्यालयामध्ये एअर कंडीशनचा वापर करू नये, मंगल कार्यालयात सर्व बाजूने हवा खेळती  राहील अशी व्यवस्था करावी.
5.मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तु / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करावे.
6.लग्नसमारंभ सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00या कालावधीतच आयोजित करावा.
7.कोणतीही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येणार नाही.
8.लग्नसमारंभाच्या ठिकाणी 55 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर माता व दहा वर्षांखालील मुलांचा प्रवेश टाळावा.
9. लग्न समारंभासाठी संबंधित तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. लग्न समारंभाच्या सात दिवस अगोदर पूर्वपरवानगी अर्ज व लग्न समारंभासाठी येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते नमूद करून यादी जमा करणे आवश्यक  राहील.
10. कार्यक्रमाच्या ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावा. मंगल कार्यालय अथवा विवाहस्थळ प्रतिबंधीत क्षेत्रात येत असल्यास विवाह सोहळा आयोजित करता येणार नाही.
वरील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करण्याची कार्यवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबत देखरेखीसाठी पथके नियुक्त केली जाणार आहेत त्यांची रचना पुढीलप्रमाणे असेल. 
नगरपालिका हद्द:- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके स्थापन करावीत.
गावपातळीवर:- ग्रामपंचायत व पोलीस विभागाची संयुक्त पथके स्थापन करावीत.
पथकाबाबत संबधित उपविभागीय अधिकारी यांची संनियंत्रणाची जबाबदारी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51,55तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार  कारवाईस पात्र असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *