Headlines

ग्रामीण भागातील रूग्ण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जि.प. सतर्क

सोलापूर-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. रूग्णसंख्या कमी करण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष उपाययोजनांवर भर देण्यात येत असून कोरोनाशिवाय इतर आजारी रूग्णांची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील मरण पावलेल्या 11 मयत रूग्णांना इतर आजार होते.
विरळ लोकसंख्या आणि घरांमधील जास्त अंतर हे कोविड-19चा प्रादुर्भाव शहरापेक्षा ग्रामीण भागात कमी असल्याचे कारण आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात अधिकाऱ्यांच्या नियंत्रण टीम तयार केल्या आहेत. ग्राम समिती आणि अधिकाऱ्यांच्या टीमच्या माध्यमातून बाहेरून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

तेरा हजार पथकांद्वारे काम
 जिल्ह्यातील रूग्णांच्या बाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले की, प्रत्येक ठिकाणी पंढरपूर पॅटर्न राबवून रूग्णसंख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे. कॅन्सर, दमा, ह्दयविकार, रक्तदाब, मधुमेह, वयोवृद्ध अशा नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात 13 हजार पथके करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आणि इतरांना थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमिटर देण्यात आले आहे. त्यांच्या सहायाने तालुका, गावनिहाय घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे. थर्मल स्कॅनच्या माध्यमातून तापमान, पल्स ऑक्सीमिटरच्या माध्यमातून रूग्णांच्या रक्तांमधील ऑक्सिजनचे प्रमाण समजणार आहे.


आजारनिहाय, वयनिहाय सर्वेक्षण
ग्रामीण भागातील सर्वेक्षणातून आजारनिहाय, वयनिहाय यादी करण्यात आली असून याचा उपयोग गंभीर आजारी रूग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी होणार असल्याचे डॉ. जमादार यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात पहिला रूग्ण 24 एप्रिल घेरडी (ता. सांगोला, मुंबईवरून आलेला) येथे मिळून आला. याच्या अगोदरपासून परगावाहून आलेल्या प्रत्येकांना होम क्वारंटाईन, संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 204 कोरोनाबाधित रूग्ण आहेत, यापैकी 87 बरे होऊन घरी गेले तर 106 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 12 मयत (यापैकी एक अपघात) झाले असून जिल्ह्यात चार गंभीर रूग्ण आहेत. जिल्ह्यातील सर्वेक्षणासाठी 13 हजार टीम तयार आहेत. पल्स ऑक्सिमीटर 3077 आणि थर्मल स्कॅनर 3920 सध्या उपलब्ध आहेत. जिल्ह्यात शासकीय रूग्णालयांसोबत 345 खाजगी रूग्णालये अधिग्रहित केली असून 446 डॉक्टर देखरेख करीत आहेत. 2558 बेडची संख्या असून 131 आयसीयू बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. गंभीर रूग्णांसाठी 44 व्हेंटिलेटर आणि 24 ऑक्सिजनची सोय करण्यात आली असून ग्रामीण भागातील मृत्यूदर शून्यावर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आठ हजार पीपीई कीट उपलब्ध असून सॅनिटायझर, मास्कची कोणतीही कमतरता नाही. जिल्ह्यात 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 431 उपकेंद्रे, 28 कोविड केअर सेंटर, 3 उपजिल्हा रूग्णालये, 16 ग्रामीण रूग्णालये आणि 13 डीसीएच (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) यांच्या माध्यमातून आजारी रूग्णांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. कोरोनाविषयी जनजागृतीसाठी समाज माध्यम, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमासोबतच साडेतीन लाख हस्तपुस्तिका (कोरोनाविषयी माहिती व कोणती दक्षता घ्यावी), 20 हजार पोस्टरद्वारे माहिती पोहोचविली.   

आजार अंगावर काढू नका
  ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र हे नॉन कोविड सेंटर असल्याने याठिकाणी नियमित लसीकरण आणि बाळंतपणाचे काम सुरू आहे. नागरिकांनी कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सामाजिक अंतर ठेवून राहणे, मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे गरजेचे असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन डॉ. जमादार यांनी केले.
  
जिल्हाभर कोरोनाची साथ असली तरी आजपर्यंत मंगळवेढा आणि करमाळा तालुक्यात रूग्ण नव्हते. आज करमाळ्यात एक रूग्ण सापडला आहे. सांगोला तालुक्यात पहिला रूग्ण सापडला असूनही तालुक्याने रूग्णसंख्या वाढू दिली नाही, हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *