१० वी चे वाजले १२ ! परीक्षा रद्द वरुन संमिश्र भावना ; गुणांकन होणार कसे? हा प्रश्न

फोटो-प्रतिकात्मक 


 
बार्शी/अब्दुल शेखराज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापांचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापांच्या गुणाने समाधानी नसतील.त्यांच्यासाठी परीक्षा घ्यायची की किंवा अन्य कोणत्या तर्‍हेने पुढ जायचं याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आता पहिली ते दहावी पर्यतचे विद्यार्थी परीक्षा न देता पुढील वर्गात जाणार आहेत.दहावी नंतर विद्यार्थ्यांना अकरावी , डिप्लोमा अशा अनेक अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.                                              

दहावीच्या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण शिक्षण हे ऑनलाइन च्या माध्यमातून झाले आहे. काही काळ पारंपरिक पद्धतीने वर्ग सुरू झाले होते.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने ते बंद झाले होते. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या नंतर समाजाच्या विविध स्तरातून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. याचा”ए.बी.एस न्यूज मराठी “ने घेतलेला आढावा. 
 ————————————————————————————————————–

परीक्षा रद्दचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर केलेला एक घातच

अनपेक्षितपणे यंदा राज्य सरकारने इतर राज्याच्या अपेक्षित निकालाप्रमाणे दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर एक घातच केला आहे. सर्वसामान्यपणे सर्वांना पास निकष लावताना त्यांचं योग्य मूल्यमापन होईलच अस नाही. पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी महत्वाचे असलेले विज्ञान –गणित-इग्रजी या विषयाची कॉमन इंन्ट्रान्स टेस्ट घेऊन प्रवेश देता येईल का यावर शिक्षण खात्याने विचार करावा. – किरण गायकवाड ,बार्शी तालुकाध्यक्ष प्रोफेशनल टिचर्स असोशिएशन बार्शी. 
—————————————————————————————————————

निर्णयाचे स्वागत.. 

महाराष्ट्र सरकारने चालू शैक्षणिक वर्षातील इ.10 वी च्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी राज्यभरातून या परिक्षाला प्रविष्ठ होतात. त्यामुळे तेवढीच कुटुंबे 10 वीच्या निकालाच्या अनुषंगाने मानसिक दबावाखाली असतात. कोविडच्या परिस्थितीमध्ये या दहावीच्या परीक्षेची काळजीची भर पडल्यामुळे अनेक कुटुंबे तसेच परीक्षार्थी विद्यार्थी चिंताग्रस्त होते.तणावाखाली होते. विद्यार्थ्यांचा वयोगट पाहता हा मानसिक ताण सहन करणे हे त्यांच्या कुवतीबाहेरचे असल्याने शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केलेल्या समोचित निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत.तसेच शासनाने योग्य वेळी जाहीर केलेल्या निर्णयाचे आभार ! – सचिन झाडबुके , समन्वयक महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन ) ,कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ                                                                                                      ———————-—————————————————————————————-


विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ,शासनाचे आभार 
दहावीच्या परीक्षा रद्दचा शासन निर्णय म्हणजे कोरोना काळातील संकटात असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी समानता आणल्याने पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सर्व पालकांना आपल्या पाल्यांच्या परीक्षेबाबत व त्यांच्या मानसिकतेबाबत काळजी लागली होती.या निर्णायबाबत शासनाचे आभार मानावे तेवढे कमीच – विजय माने ,पालक 
—————————————————————————————————————

ज्ञान वाया जाणार नाही , प्राप्त परिस्थिती पाहता निर्णय योग्यच 

प्राप्त परिस्थिती पाहता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय योग्य वाटतो. आपले पहिले प्राधान्य हे आपले आरोग्य असले पाहिजे ,परंतु मागील एक वर्षापासून जी गंभीर ,चिंताजनक परिस्थिती चालू आहे , अशा तणावपूर्वक वातावरणामध्ये आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास केला. ऑनलाईन मध्ये येणार्‍या अडचणीला सामोरे जात जिद्दीने अभ्यास केला.आम्ही परीक्षेसाठी पूर्ण तयारी केली .बोर्डाने परीक्षेच्या माध्यमातून आमचं मूल्यमापन करण्याचा निर्णय रद्द केला असला ,तरी आम्ही वर्षभरामध्ये अभ्यासाच्या माध्यमातून जे ज्ञान मिळवलेलं आहे ते तर बोर्डाने काढून घेतलेले नाही. त्याचा फायदा निश्चितच आम्हाला भावी आयुष्यामध्ये होणार आहे. या अभ्यासामधून व्यक्तिमत्त्व घडवण्याची संधी मिळाली ,याचा फायदा निश्चितच आम्हाला करियर साठी होईल . – अजिंक्य बाळासाहेब गव्हाणे , विद्यार्थी सुलाखे हायस्कुल ,बार्शी 
—————————————————————————————————————

परीक्षा रद्द म्हणजे आमच्या वर अन्याय ,अन्य पर्यायचा शोध घ्यावा 

विदयार्थ्यांसाठी दहावी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची पाहिली उत्तम संधी असते. सुरुवातीच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अभ्यासातील लक्ष खुप विचलित झालेले होते.परिक्षेसंदर्भात तणाव निर्माण झालेला होता . परंतू मा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या दहावीच्या सर्व विदयार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयामुळे आम्हाला आता दहावीची परिक्षा देता येणार नाही. परिक्षा होतीलच या आशेवर विदयार्थी परिक्षेसाठी अथक कष्ट करीत होते. शाळेचे व शिकवणीचे ऑफलाइन – ऑनलाइन लेक्चर करीत होते. यामुळे परिक्षा रद्द करणे म्हणजे आमच्या अभ्यास कार्यावर अन्याय केल्यासारखेच आहे. मान्य आहे की, परिक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे म्हणजे विदयार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखेच आहे . परंतू परिक्षा रद्द करणे हा त्यावरील उपाय नाही, दूसरे अन्य पर्याय शोधणे आवश्यक आहे. – साक्षी अरूण शिंगनाथ ,विद्यार्थी , महाराष्ट्र विद्यालय बार्शी
—————————————————————————————————————

विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी बनायला हवे


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या बाबतचा निर्णय झाला. राज्य शिक्षण मंडळाची आणि शालेय शिक्षण विभागाची पर्यायी व्यवस्था निर्माण करून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची तयारी होती हे त्यांनी अधिकृतपणे सांगितले होतेच , परंतु केंद्रीय शिक्षण मंडळाने अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील पालक विद्यार्थी शाळा व्यवस्थापन शिक्षक संघटना यांचा राज्य सरकारवर दबाव वाढत गेला व परीक्षेबाबत निर्णय झाला असे दिसते.                                                                                                                                                                                    
याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र भावना निर्माण होणे साहजिक आहे. परंतु कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेला निर्णय हा परिस्थितीजन्य आहे. त्यामुळे राज्यातील पालक व विद्यार्थी हा निर्णय सकारात्मक घेतील अशी मला आशा आहे.विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी बनायला हवे. घेतलेल्या ज्ञानाचा भविष्यात नक्की उपयोग होतो.त्यामुळे नियमित सराव वाचन व अभ्यास करायचा सोडू नये. आवडते विषयाचे अवांतर वाचन , कलागुणांना वाव देणे, असे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा. ही परीक्षा रद्द झाली असली तरी भविष्यात अनेक कठीण परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
– सुधीर बा खाडे – तज्ञ शिक्षण समुपदेशक

—————————————————————————————————————

मुलांच्या भावनांचा आदर करणारा निर्णय


शासनाने या पूर्वी इयत्ता 1 ली ते 9 वी व 11वी च्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे 10वी च्या विद्यार्थ्यांच्या मनात देखील संभ्रम निर्माण झाला होता .परंतु शासनाने शालान्त परीक्षा रद्द केल्याने मुलांच्या भावनांचा आदर केला. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्र्यांचे व शासनाचे खूप आभार!- सौ. सुवर्णा वैद्य
मुख्याध्यपिका विद्या मंदिर कन्या प्रशाला, वैराग
—————————————————————————————————————

मुलांना स्पर्धा कशी कळणार ?


इयत्ता १०वी च्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्याची बातमीऐकून मन अगदी खिन्न झाले.जिथे स्वतःला मोजताच नाही आले किंवा मूल्यमापन नाही करता आले तिथे स्पर्धा कोणाशी आणि कशी असते ? स्पर्धा हे मुलांना कसं कळणार , याचा जाब विचारायचा कोणाला ? बोर्डाची परीक्षा रद्द केली म्हणून पालक नाराज तर विद्यार्थी खुष आहेत. निरागस मुलांना काय कळणार बोर्ड परीक्षा . परीक्षा व्हायला हव्या होत्या.विद्यार्थांचे मुल्यमापन झालेच पाहिजे. त्या शिवाय जगातील कॉम्पीटिशन किती व कशी असते तेच मुलांना कळली नसती.- जोत्सना डोके – शिवछत्रपती विद्यामंदीर पांगरी , मुख्याध्यापिका

Leave a Reply