Breaking NewsSangliStudent Unionsyuva sanvaad

विद्यार्थी चळवळ काल आज आणि उद्या – एक चिंतन

 

विद्यार्थी चळवळ काल आज उद्या

 

स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थी चळवळ

 

 नामवंत तत्त्ववेत्ता प्लेटो याने अडीच हजार वर्षांपूर्वी असे म्हटले आहे की राजकारणाचा गैरवापर करून गोरगरिबांचे शोषण करणारा,अन्याय अत्याचार करणारा ,गरिबाला अधिक गरीब व श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा शासक वर्ग मला मान्य नाही तर विद्यार्थ्यांनीच शिक्षण घेऊन,चिकित्सक राहून राजकारण करावे व अशाच नवतरुणांना गल्लीपासून देशा पर्यंतचे शाषक बनवावे. त्यानंतर आधुनिक काळात राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी म्हटलेय की दारिद्र्य, विषमता व अंधश्रद्धा या व अशा स्वरूपाच्या सर्व समस्यांचे मूळ समाजाच्या अडाणीपणातच आहे.हे अडाणीपण ,अज्ञान नष्ट करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरं कोणतही बलवत्तर साधन नाही. म्हणूनच देशाला तिमिरातून तेजाकडे म्हणजेच प्रकाशाकडे न्यायचे असेल तर उद्याचे भविष्यकर्ते म्हणजेच विद्यार्थी व त्यास योग्य दिशा प्राप्त करून देणारे शिक्षण याला मानवी जीवनात खूप महत्त्व आहे.घडलेल्या इतिहासाचा व सध्याच्या भोवतालच्या राजकीय, सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक ,भौगोलिक परिस्थितीचा स्वतःच्या अनुकरणातून, वाचनातून, निरीक्षणातून ,अनुभवातून,अभ्यासातून आढावा घेत उभरत्या वयाकडे जाणारा घटक म्हणजेच विद्यार्थी.तेव्हा अगदी पहिलीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत च्या विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण, त्यात येणारे अडसर,ते अडसर दूर करण्यासाठी होणारे प्रयत्न व त्याचा होणारा लाभ अथवा हानी या सगळ्या गोष्टींचा समावेश विद्यार्थी चळवळया घटकात आपल्याला करावा लागेल .
कोणतीही चळवळ म्हटलं की तिथे राजकारण आलंच असे समजले जाते.अन ते खरेच आहे.कारण चळवळ ही बदलासाठी चे प्रयोजन असते. तर समाज कसा बदलणार हे ठरवणारे होकायंत्र म्हणजे राजकारण असते. समाजाच्या सर्वांगीण बदलासाठीचा लढा अथवा सर्वंकष प्रयत्न हा राजकारणाचाच एक भाग असतो.समाजातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी निगडित आहे.त्यामुळे या सर्वांचाच पगडा हा आम जनतेवर पडलेला असतो. त्यामुळे राजकारणाशी तळातलीही व्यक्ती जोडली गेलेली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेत अथवा घडामोडीत राजकारण दडलेले आहे.म्हणूनच समाजातील कोणतीही व्यक्ती राजकारणापासून तशी अलिप्त आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही.म्हणूनच विद्यार्थ्यांचे सुद्धा त्यांच्या शैक्षणिक पातळीवरचे जे राजकारण आहे त्यालाच “विद्यार्थी संघटनांची चळवळ” असेही संबोधले जाते.
 विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतो तेव्हापासूनच त्याचा राजकारणाशी संबंध सुरू होतो.तो शेवटपर्यंत…….
 परंतु यात राजकारण आहे, ते कसे चालते ,त्याचा आपल्या पालकांना कसा त्रास होतो ,मी त्याच्याशी कसा जोडला गेलो आहे हे त्याला महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतरच खरी समज येते.त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या चळवळीत जास्तीत जास्त विद्यार्थी हे आपल्याला महाविद्यालय स्तरावरीलच दिसून येतात. महाविद्यालयीन स्तर हा विद्यार्थ्यांच्या विचारसरणीचा पाया पक्का होत असल्याचा स्तर आहे. आणि विद्यार्थी संघटना सुद्धा आपल्या संघटनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणातील प्रश्न कमी पण विचारसरणी कोणती घेऊन वावरायचे याबद्दलच ज्यादा बोलताना दिसतात.त्याचा बरा-वाईट अनुभव जेव्हा विद्यार्थ्यांना येतो तेव्हा विद्यार्थी चळवळी बद्दलच त्यांच्याच मनात बऱ्याच वेळा संभ्रम निर्माण होतो.तो होऊ न देणे व विद्यार्थ्यांना तो ज्या प्रकारचे शिक्षण घेतो तेथील उद्भवणाऱ्या समस्या, त्याचा पालकांना भोगावा लागणारा त्रास,त्याचा स्वतःच्या जीवनावर होणारा परिणाम, यासाठी संघटित पणाने कराव्या लागणाऱ्या गोष्टीबाबतचे प्रबोधन खऱ्या अर्थाने विद्यार्थी चळवळींनी करायला हवे असते.ते बऱ्याच वेळा होताना दिसत नाही. म्हणूनच राज्य देश व जगभरातील विद्यार्थी चळवळ समाजातल्या सर्वच घटकांनी समजून घेणे क्रमप्राप्त आहे असे मला वाटते.
खरतर विद्यार्थी चळवळ ही सातत्याने चालणारी एक सजग चळवळ समजली जाते.फक्त ती कधी कधी चर्चेत नसते तर कधी कधी अचानक मोठ्या प्रमाणात चर्चेला येते. सातत्याने समाज जीवनात चढ-उतार असणारी ही चळवळ भारतीय राजकारणाचा व समाजकारणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील विद्यार्थी ठरवत असतात म्हणूनच उमदे कर्तुत्ववान व तितकेच प्रगल्भ असे विद्यार्थी घडवणे हे सरकारचे पर्यायाने समाजाचे दायित्व असते.विद्यार्थ्यांना नेमकं काय हवंय,?त्याची मानसिकता काय?, त्याची बौद्धिक निकड काय? ,त्याच्या पालकाचा स्तर कोणता ?तू ज्या इयत्तेत शिकतो त्या मधील नेमके प्रश्न काय ?याकडे कोणीही फारसे गांभीर्याने आजवर पाहिलेले आहे असे दिसून येत नाही. म्हणूनच विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून संघटीत होऊन शिक्षण व्यवस्था शासन आणि यंत्रणा यांच्या विरोधात  कधीकधी विद्यार्थी चळवळी बेधडकपणे उभ्या राहताना आपल्याला दिसतात.अशा विद्यार्थी चळवळीतूनच कोणतीही राजकीय परंपरा अथवा पार्श्वभूमी नसलेले अनेक राजकीय धुरंदर व्यक्ती या देशाला दिलेले आहेत ही सुद्धा मोठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच विद्यार्थी चळवळीचे महत्त्व आपल्याला कमी लेखता येणार नाही.
 
 
 विद्यार्थी चळवळीचा इतिहास
 
भारतातील विद्यार्थी चळवळीच्या  प्रारंभाचा इतिहास हा जवळजवळ एकशेब्यान्नव वर्षापूर्वीचा आहे. विद्यार्थी चळवळीचा प्रारंभ एकोणीसाव्या शतकात 1828मध्ये प्रथम सापडतो. विवियन हिरोजिओ यांनी कलकत्त्यात अकॅडमिक असोसिएशन नावाची पहिली विद्यार्थी संघटना स्थापन केली होती.त्यांच्या अगदी तरुणपणी कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये त्यांचे व्याख्यान झाले व त्यांनी आजूबाजूच्या विद्यार्थी तरुणांना गोळा करून एक संघ उभारला व नियमितपणे शैक्षणिक सामाजिक व राजकीय प्रश्नावर चर्चा करू लागले हीच पहिली विद्यार्थ्यांची चळवळ. त्यानंतर दुसरी विद्यार्थ्यांची संघटना मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये सुरू केली. ती सुप्रसिद्ध नेते अर्थतज्ञ दादाभाई नवरोजी यांनी….
 भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वातील या नेत्याने 1848 मध्ये स्टुडन्ट सायंटिफिक अँड हिस्टोरिक सोसायटीया नावाने कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक गट बनवला आणि आठवड्यातून एक अथवा दोन वेळा सर्वांनी एकत्र येऊन विविध विषयावर चर्चा करण्याचे ठरवले.त्यानंतरच्या काळात आनंद मोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1876साली कलकत्त्यात स्टुडंट्स असोसिएशननावाची विद्यार्थी संघटना स्थापन केली आणि या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या जाहीर सभा घेण्याचा व जनआंदोलन उभारण्याचा मार्ग स्वीकारला. शिवाय 1885 झाली राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत या चळवळीने महत्त्वाची भूमिका पार पडली.त्या काळी भारतातील सर्वात महत्त्वाची प्रशासकीय परीक्षा होती आय.सी.एस. मात्र ती द्यायला भारतीय विद्यार्थ्यांना थेट इंग्लंडला जावे लागायचे. म्हणून स्टुडंट्स असोसिएशनने आयसीएस परीक्षेला बसण्यासाठी वयोमर्यादा वाढवावी व ती परीक्षा इंग्लंड बरोबरच भारतात व्हावी यासाठी आंदोलन उभारले गेले. याशिवाय छोट्या-छोट्या गटांद्वारे एकोणिसाव्या शतकात दक्षिण भारत, पाटणा ,दरभंगा ,आसाम आणि भारताच्या इतर काही ठिकाणी विद्यार्थी युवकांचे आंदोलने झाली व यातूनच संघटना बांधल्या गेल्या.याच शतकात शिक्षणाला एक नवा आयाम प्राप्त करून देण्याचे काम महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी करून स्त्री शिक्षणाचा पाया घातला व शिक्षण प्रसाराला गती दिली. त्याचबरोबर ब्रिटीशांच्याकडे बहुजन समाजाला किमान पट्टीपुरते तरी शिक्षण द्या अशी आग्रही मागणी केली. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1883 साली आपल्या संस्थानातील अमरेली तालुक्यात सर्वप्रथम सक्तीचे व मोफत शिक्षणाचा प्रारंभ करून एका नव्या विषयाला तोंड फोडले गेले.1902साली करवीर संस्थानात छ.शाहू महाराजांनी सक्तीचे व मोफत शिक्षण सुरु केले होते.अशारीतीने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात कलकत्ता मुंबई मद्रास व अलाहाबाद येथे विश्वविद्यालये व अनेक कॉलेज शाळा स्थापन झाल्या होत्या व यातून ब्रिटिश भारतातील मध्यम व उच्च शालेय विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखावर गेली होती. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या 14हजारापेक्षा जास्त झाली होती.  देशात बडोदा व कोल्हापूर या संस्थानातील दिले जाणारे शिक्षण व इतर ठिकाणचं शिक्षण आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील वंगभंग चळवळ अशा अनेक कारणातून 1906 ते 1908 च्या दरम्यान अँनि बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेज च्या मॅक्झिन मध्ये अखिल भारतीय पातळीवर विद्यार्थी संघटना असायला हवी यावर भर दिला होता.त्यानंतरचे 1914सालचे पहिले महायुद्ध, 1917 सालची रशियात झालेली राज्यक्रांती ,त्याचाच परिणाम म्हणजे भारतातील स्वातंत्र्य आंदोलनात झालेली वाढ यातूनच 1920साली देशभर असहकार आंदोलनाने उचल खाल्ली होती.अशातच 25 डिसेंबर 1920रोजी नागपूर येथे भारतातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पहिली परिषद भरली. या परिषदेच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आर .जे.गोखले तर उद्घाटक लाला लचपतराय होते.या परिषदेत असहकार आंदोलनात भाग घेण्याचा, स्वदेशी ला पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. तुलनात्मक दृष्ट्या विसाव्या शतकाच्या पहिल्या तीस-पस्तीस वर्षात शिक्षणाचा प्रसार अधिक झाला. विश्वविद्यालयाची संख्याही वाढून1935-36साली सोळा झाली. कॉलेजची संख्या वाढून 340 झाली.सेकंडरी शाळांची संख्या वाढून ती 14,414 झाली. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे राष्ट्रीय व विद्यार्थी युवक आंदोलनासाठी भौतिक आधार तयार झाला होता. देशभर अनेक विद्यार्थी संघटना बनल्या होत्या. जागेअभावी सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. विद्यार्थी युवकांच्या आंदोलनात वाढ होत होती. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात भगतसिंग राजगुरू सुखदेव शिरीषकुमार सारख्या विद्यार्थ्यांनी आपले प्राण दिले होते .त्यांच्या प्रेरणेनेच 12ऑगस्ट 1936 ला लखनऊ येथील गंगाप्रसाद हॉलमध्ये या देशातील विद्यार्थ्यांचे दोनशे स्थानिक गट व अकरा प्रादेशिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (ए आय एस एफ)ही अखिल भारतीय स्वरूपाची पहिली विद्यार्थी संघटना स्थापन केली. अन बहुतांशी स्वातंत्र्यलढ्याच्या मागण्या घेऊनच देशभर विद्यार्थी संघटना काम करीत राहिली. त्यात डिफेन्स ऑफ इंडिया वटहुकूम लागू करण्यास विरोध, राष्ट्रीय सरकारची मागणी,दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फॅसिझम विरोधी प्रचार, 1943 च्या भारतातील मोठ्या दुष्काळात जनतेला हरप्रकारे मदत आणि इतर आंदोलनात सक्रिय राहून विद्यार्थी चळवळ काम करत होती.अर्थात स्वातंत्र्य मिळवणे हा प्रमुख उद्देश तत्कालीन विद्यार्थी चळवळीसमोर राहिला होता. त्यामुळेच बाल शिरीष कुमार पासून शहीद भगतसिंग पर्यंत कितीतरी विद्यार्थी देशाच्या कामी आले तर वि. दा. सावरकर ,चाफेकर बंधू, पंडित नेहरू ,सुभाषचंद्र बोस, भगतसिंग राजगुरू सुखदेव असे अनेक विद्यार्थी नेते तरुणाईचे त्यावेळेस तरुणाईचे चेहरे होते.स्वदेशी आंदोलन, भारत छोडो आंदोलन, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग अशा लढ्यात स्वतःला झोकून दिलं होतं. तरीही त्या लढ्याच्या केंद्रस्थानी विद्यार्थी मात्र नव्हता हे विशेष.सर्वात महत्वाचा भाग असा होता की स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील विद्यार्थी चळवळ ही पक्षीय राजकारणापासून दूर होती तर तिचे लक्ष एक तर आपल्या शैक्षणिक प्रश्नावर होते किंवा अधिकांश व्यापक राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या प्रश्नावर होते. अशा रीतीने स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थी चळवळ ही जास्तीत जास्त राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारावून गेलेली एक महत्त्वपूर्ण चळवळ होती.सारे देशवासी  ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा 15ऑगस्ट 1947 हा दिवस. या दिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत स्टुडंट्स फेडरेशन व स्टुडंट्स काँग्रेस यांनी संयुक्त मिरवणुका काढल्या होत्या. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा पुतळा जाळला होता.
 
आता देशाला स्वातंत्र्य मिळाले.स्वातंत्र्यानंतर भारतातील विद्यार्थी चळवळीपुढे नवीनच परिस्थिती निर्माण झाली. प्रश्न होते देशाच्या पुर्नउभारणीचे, नोकऱ्यांचे व शिक्षणाचे. देशाचे स्वातंत्र्य टिकवणे, औद्योगिकरण व योजनाबद्ध विकास याचा आधार घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रात कोट्यावधी लोकांना स्वस्त शिक्षण देण्याची गरज होती. शिक्षणाला देशाच्या विकासाच्या गरजांशी जोडण्याची गरज होती. त्यामुळे विद्यार्थी चळवळीने आपले काम सकारात्मक पद्धतीने आता सुरू ठेवले. त्यात विद्यार्थी निवडणुका, विद्यापीठ विधेयक ,गोवामुक्ती आंदोलन, पाटणा गोळीबार, धान्य टंचाई विरोधी आंदोलन, तेलंगणाचा लढा अशा राष्ट्रीय प्रादेशिक व अनेक स्थानिक प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या चळवळी काम करीत राहिल्या.1960नंतर देशातील विद्यार्थ्यांचे जगभरातील अनेक आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले. त्यात फ्रान्समधील सबाँर्न विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गाँलया हुकूमशहा च्या विरोधात उभारलेले बंड, अमेरिकन विद्यार्थ्यांनी अमेरिकन सरकारच्या युद्धविरोधी धोरणांचा निषेध करत उभारलेली हिप्पी चळवळ,चीनमधील सांस्कृतिक क्रांती नंतर उभारलेली माओची आक्रमक चळवळ, तुर्कस्तान देशातील विद्यार्थ्यांचा स्वतंत्र देशाचा लढा अशा चळवळींनी जगाच्या पातळीवर उग्र स्वरूप घेतले होते. भारतातही विविध राज्यात विद्यार्थी चळवळी अगदी आघाडीवर राहून काम करीत होत्या. त्यात आसाम गण विद्यार्थी परिषद, खलिस्तान च्या मागणीला पाठिंबा देणारी पंजाबमधील शीख विद्यार्थ्यांची ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशन तर संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ए.आय. एस .एफ, एस.एफ .आय, एन. एस .यु. आय ,ए.बी.व्ही.पी.,छात्र युवा संघर्ष वाहिनी ,शांतिसेना अशा चळवळींचे काम नेटाने चालू होते .1980च्या दशकापर्यंत विद्यार्थी चळवळ एका विशिष्ट ध्येय धोरणाशी सुसंगत काम करत राहिली. त्यानंतर मात्र धर्मांध राजकारणाचा, राजकारणाच्या गुन्हेगारी करणाचा ,खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाचा असा गुंतागुंतीचा काळ जेव्हा निर्माण झाला तेव्हा समकालीन विद्यार्थी चळवळीनी आपल्या ही कामाची पद्धत बदललेली दिसते.आपल्या मूळ प्रश्नापेक्षा आपण ज्या राजकीय पक्षाशी संबंधित आहोत त्या पक्षाची ध्येय धोरणे विचारात घेऊन काही चळवळी काम करू लागल्याने विद्यार्थी संघटनांचे प्रश्नही विसंगत पद्धतीने मांडले जाऊ लागले. महाराष्ट्राच्या पातळीवर विचार करता बहुजन विद्यार्थी परिषद, छात्रभारती, छात्र जनता दल ,पुरोगामी विद्यार्थी संघटना ,विद्यार्थी सेना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ,सम्यक विद्यार्थी आंदोलन, प्रहार विद्यार्थी संघटना अशा अनेक संघटना आपापल्या पातळीवर काम करीत राहिलेल्या आजही आपल्याला दिसून येतात. जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण धर्मांध राजकारण राजकारणाचे गुन्हेगारीकरण अशातून जर शोषणाला व विषमतेलाच जर विविधता म्हणून सांगितले जात असेल तर विद्यार्थी चळवळीतही संभ्रम निर्माण होणे ओघाने आलेच. यातून या नव्या उगवत्या पिढीला बाहेर काढणं आणि मूळ विद्यार्थी प्रश्नावर त्यांचे अधिकाधिक प्रबोधन करणं,लक्ष केंद्रित करणं आणि त्यांना देश उभारणीच्या कामी आपले योगदान कसे देता येईल हे सांगणं खूप महत्त्वाचं ठरतं. गेल्या काही वर्षात तर विद्यार्थी चळवळी काही भागात जरी काम करीत असल्या तरी देशपातळीवर क्षीण झाल्या की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. शिक्षणाचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असताना, दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे प्रश्न बिकट झालेले असताना, आजूबाजूला धर्मांध राजकारणाने उच्छाद मांडलेला असताना, संविधानच वाचवणे काळाची गरज असताना गेल्या काही वर्षात म्हणावा तितका विद्यार्थी संघटनांचा आवाज आपल्याला जाणवत नाही. शाळा कॉलेज संस्था विद्यापीठ ही या देशाचे भावी नागरिक घडवणारी महत्त्वाची केंद्रे असताना संस्थात्मक राजकीय दबावाला कंटाळून रोहित वेमुला सारखा विद्यार्थी आत्महत्या करतो,जे एन यू सारख्या देशातील नामांकित शिक्षण संस्थेतील कन्हैयाकुमार सारख्या प्रतिभावान विद्यार्थी नेत्यास राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक होते ,पुण्याच्या एफटीआयआय मधील विद्यार्थ्यांचे उग्र आंदोलन, एन आर सी ,सी ए ए विरोधातील आसाम मधील विद्यार्थ्यांचे उग्र आंदोलन अशा घटना जेव्हा देशाला पाहाव्या लागतात तेव्हा विद्यार्थी चळवळ सक्षमपणे उभे राहणे आणि देशाला नवी दिशा देणाऱ्या या घटकाला अधिक कार्यप्रवण करणं ,योग्य दिशेने कार्य प्रवणं करण आवश्यक ठरतं .गेल्या दोन-चार वर्षात नजरेत भरणाऱ्या या घटना पाहून देशात ठिक ठिकाणी विद्यार्थ्याची आंदोलने झाली हे सुद्धा खरं आहे. परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलभूत प्रश्नावर सक्षमपणे उभा करण्याचे धडे विद्यार्थी चळवळीनी मोठ्या प्रमाणात घ्यायला हवं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे.विद्यार्थी हा शिकत असल्यामुळे तो हळूहळू समजायला लागले की तत्त्वज्ञानाकडे निश्चितपणे वळणार असतो त्यामुळे सुरुवातीलाच गांधीवादी, समाजवादी ,मार्क्‍सवादी, फुलेवादी ,आंबेडकरवादी स्त्रीवादी अशा बाबी विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मूलगामी प्रश्नावर प्रबोधन करून सक्षम पणे उभे करणे आणि आंदोलनात उतरवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सभोवतालच्या राजकीय सामाजिक प्रश्नावरील जाणीव जागृती बाबतचे वेगळे अभ्यासवर्ग सुद्धा विद्यार्थी चळवळींनी घ्यायला हवेत. प्रबोधन कार्यशाळा, क्षेत्र अभ्यास भेटी, वैचारिक अभ्यास शिबिरे यातून विद्यार्थी चळवळ अधिक कार्यक्षम व सक्षम बनवू शकते यालाच तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याचाही विचार चळवळींनी करायला हवा. विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळताना विद्यार्थी चळवळी प्रामुख्याने महाविद्यालयीन स्तर टार्गेट करून काम करताना दिसून येतात.मात्र माध्यमिक,उच्च माध्यमिक व शालेय विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष हीसुद्धा चिंताजनक बाब आहे याचीही जाणीव विद्यार्थी चळवळीतल्या नेतृत्वांनी ठेवायला हवी असे वाटते. 1983सालापासून विनाअनुदानित तत्त्व जेव्हा शिक्षणव्यवस्थेत शिरले तेव्हापासून शिक्षणाच्या खाजगीकरणाने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलं याचा मोठा फटका समाजातल्या तळातल्या घटकांना बसला हेही लक्षात घ्यायला हव.तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले जात पडताळणी प्रमाणपत्रे यातील क्‍लिष्ट बाबी कशा काढून टाकता येतील यावरही विद्यार्थ्यी चळवळीनी काम करायला हवे.आधुनिक तंत्रज्ञानाची जोडून घेऊन विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या करीअरच्या संधी कशा उपलब्ध  करता येतील, त्याचबरोबर स्पर्धेच्या सध्याच्या काळात शिक्षणव्यवस्थेत अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात त्यात फी वाढीचे प्रश्न ,वसतिगृहातील अडचणी, प्रश्नपत्रिका फुटणे, गेल्या दहा वर्षांपासूनचा अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी शाळातील 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, परदेशी विद्यापीठांचा होणारा शिरकाव, अलीकडील अनेक विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर राज्य सरकार, कुलपती, केंद्र सरकार यांच्यात नसणारा ताळमेळ अशा अनेक समस्यावर विद्यार्थी वर्गाचं लक्ष केंद्रित करून नियोजनबद्ध काम करणं हे भविष्यकाळात विद्यार्थी चळवळी पुढील खरे आव्हान ठरणार आहे.तसेच मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असणारे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण यातील प्रश्नाकडे सुद्धा विद्यार्थी चळवळीनी लक्ष देऊन सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्राचा विचार करता आज प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 2कोटी 67 लाख 5 हजार 823 असून त्यांना अध्यापन करणारे फक्त प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षकांची संख्या जरी विचारात घेतली तरी ती 7 लाख 43 हजार 466 इतकी आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक वर्ग हा प्राथमिक आणि माध्यमिक व्यवस्थेत असताना विद्यार्थी चळवळींनी त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं हे बरोबर नाही.म्हणूनच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना बरोबर घेऊन सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी काय करता येऊ शकते  याचा गंभीर विचार आगामी काळात विद्यार्थी चळवळींनी करायला हवा. गळती स्थगिती च्या प्रश्नावर मात करून शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थी संख्येत जरी गेल्या अनेक वर्षात वाढ झाली असली तरीही शाळेत आलेले विद्यार्थी टिकून राहतात का?त्यांना दर्जेदार शिक्षण, सर्वांना समान शिक्षण मिळते का ?या बाबतही चळवळींनी सतर्क राहायला हवे .तसेच शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे ,कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे धोरण ,प्रत्येक सरकारी शाळेला क्लार्क आणि शिपाई दिला गेला पाहिजे अशा अनेक मागण्या या विद्यार्थी संघटनांनी सुद्धा उचलून धरायला हव्यात. भारतातल्या ज्या विद्यापीठात गेल्या काही वर्षात तीव्र आंदोलने होत आहेत ही फार प्रतिष्ठित विद्यापीठे आहेत.तिथे प्रवेश मिळणंही सोपं नाही.अशा ठिकाणी जर आंदोलन होत असतील तर या देशाच्या सर्वच भागातील विद्यार्थ्याचे प्रश्न किती आ वासून उभे असतील याचा विचार चळवळीनी करायला हवा. भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे .त्यातून बेरोजगारीचा मोठा धोका देशापुढे आहे.तसेच आता कोवीडमुळे आर्थिक मंदीचा काळ आलेला आहे आणि त्यामुळे बेरोजगारी व आर्थिक मंदी बाबतच्या बातम्या या पोटात गोळा आणणार्या ठरू पाहत आहेत. एका संपूर्ण तरुण पिढीला या बाबी म्हणजे आपल्या भवितव्याची काळजी वाढवणार्या ठरु पाहत आहेत. शिक्षणक्षेत्रात नवे प्रश्न निर्माण होत असताना विद्यार्थी संघटनांनी अभ्यास व संघर्ष ही भूमिका कायम ठेवून या देशाचा सक्षम आदर्श नागरिक बनण्यासाठी कार्यप्रवण राहणे ही काळाची गरज आहे.
 

मारुती बळवंत शिरतोडे

वाझर ता.खानापूर जि.सांगली

9096239878

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!