भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम – थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईझ (Tropex 21)


नवी दिल्‍ली- भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम – द्विवार्षिक थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईझ (Tropex 21) जानेवारीच्या सुरूवातीला सुरू झाला असून सध्या जहाजे, पाणबुडी, विमान तसेच भारतीय सैन्य, भारतीय हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या कार्यान्वित तुकड्यांच्या सहभागाने सुरू आहे.  फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यात या सरावाचा समारोप होईल.

हिंद महासागर क्षेत्रात हा सराव आयोजित करण्यात आला असून सध्याच्या भौगोलिक धोरणात्मक संदर्भात जटिल  बहु-आयामी परिस्थितीत नौदलाच्या लढाऊ सज्जतेची चाचपणी करणे हा यामागचा उद्देश आहे. नौदलाच्या संरक्षण क्षमतांचे प्रमाणीकरण करणे, सागरी क्षेत्रातील राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणे आणि हिंद महासागर प्रदेशात स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करणे हा देखील या ट्रोपेक्स सरावाचा उद्देश आहे. भारतीय नौदलाचे तीनही कमांड आणि पोर्ट ब्लेअर येथील ट्राय सर्व्हिसेस कमांडच्या सहभागाने नौदल मुख्यालयांकडून ट्रोपेक्सचे संचलन केले जात आहे.

ट्रॉपेक्स विविध टप्प्यांतून जात असून शांतता काळापासून युद्धापर्यत नौदलाच्या स्थित्यंतराची देखील चाचणी केली जाते. पहिल्या टप्प्यात, भारतीय नौदलाने 12-13 जानेवारी  2021 रोजी किनारपट्टी आणि बेटांवर ‘सी व्हिजिल’ हा किनारपट्टी संरक्षण सराव आयोजित केला होता. या अभ्यासाचा उद्देश देशाच्या किनारपट्टीच्या संरक्षण व्यवस्थेस मान्यता देणे हा होता. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनंतर संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली होती. या सरावात भारतीय नौदल, तटरक्षक दल, 13 किनारपट्टी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे सागरी पोलिस आणि सागरी क्षेत्रातील इतर हितधारकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.


सी व्हिजिल सरावानंतर 21-25 जानेवारी दरम्यान अँफेक्स -21 हा तिन्ही सेवादळांचा संयुक्त सराव पार पडला.

Leave a Reply