Breaking News

पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे- दादाजी भुसे

नंदुरबार/गुणवंत पाटील  : – शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे आणि बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित होते.
श्री.भुसे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे व तो संकटातून सावरावा यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. बँकांनी कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने बँकांनी सहकार्याची भूमीका घेवून ग्रामीण शेतकऱ्यांना मदत करावी व वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे.
आदिवासी दिनी रानभाज्या महोत्सव
रानभाज्यांची चव शहरी भागात आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त कृषी विभागातर्फे राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने ग्रामीण भागात राहणाऱ्या बांधवांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या भाज्या व दुर्गम भागात आढळणारी फळे आरोग्याच्या दृष्टीने देखील उपयुक्त असल्याने त्याची ओळख जनतेला होणे आवश्यक आहे.
पुढील काही दिवसात युरियाचा पुरवठा
युरियाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे विनंती केली आहे. शासन स्तरावर त्याबाबत प्रयत्न होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही ठिकाणी वाहतूकीस विलंब होत आहे. मात्र येत्या आठवड्यात खताचा पुरवठा सुरळीत होईल व जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याबाबत नियोजन करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे श्री.भुसे यांनी सांगितले.
गटशेतीला प्रोत्साहन
शासनातर्फे गटशेती आणि कृषी उत्पादकांची कंपनी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल तेच पिकेल’ या संकल्पनेनुसार जिल्ह्यात तयार होणाऱ्या भगरीचे ब्रँडींग आणि आकर्षक पॅकेजींग करण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभाग पुढाकार घेईल. 
मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि शेततळे तयार करण्यावर भर देण्यात येईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी कृषी विभागाकडून सहकार्य केले जाईल. फळबाग लागवडीला प्रोत्साहन देताना स्थानिक वातावरणास पोषक फळझाडांची निवड करावी, असे त्यांनी सांगितले. पीएम किसान योजनेचा अधिकाधीक शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी 15 दिवस विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, 
अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन
जिल्ह्यात मनरेगा, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि पीएम किसान योजनेअंतर्गत चांगले काम झाल्याबद्दल श्री.भुसे यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. संकटाच्या काळात जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांकडून कापुस खरेदी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पीक परिस्थिती, खत उपलब्धता, शेतकऱ्यांसाठी विविध योजना, पीक कर्ज वाटप, जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती आदी विषयी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!