पालकांनो सजग रहा, लसीकरण करून घ्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा सल्ला

 

सोलापूर,दि.22 : सध्या कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याची दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. मोठ्या माणसांसोबतच लहान मुलांना कोरोना संसर्ग होत आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीच्या केसेस कमी आहेत. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे, यामुळे पालकांनी ‘माझी मुले..माझी जबाबदारी’ ओळखून अधिक सजग राहून लसीकरण करून घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद….

            कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केवळ एक टक्का तर दुसऱ्या टप्प्यात 10 टक्के मुलांना बाधा झाल्याचे दिसून येत आहे. वयस्करांमध्ये कोरोनामुळे आजार बळावत असून काही लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. वयस्क आणि लहान मुलांना कोरोनाची लक्षणे सारखीच असतात.

            कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि गॅस्ट्रोची लक्षणे दिसून येत आहेत. मुलांना धोका आपल्या पालकांपासून जास्त असतो, तेच मुलांच्या संपर्कात जास्त असतात. यामुळे पालकांनी घरी गेल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवावेत, कपडे बदलून लहान मुलांना घ्यावे, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

·         लक्षणे

ताप येणे, सर्दी, खोकला.

चव जाणे, वास न येणे.

धाप लागणे.                 

पोटात दुखणे

उलट्या/जुलाब होणे.

डोळे लाल होणे.

अंगावर पुरळ उठणे.

भूक न लागणे किंवा कमी होणे.

·         प्रतिबंधात्मक उपाय

मास्कचा वापर करावा. मात्र दोन वर्षांच्या खालील बालकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, यामुळे त्यांना मास्क वापरण्यास देऊ नये.

सुरक्षित अंतर ठेवून खेळणे.

घरातील मोठे कार्यक्रम टाळावेत.

गर्दीच्या ठिकाणी, कार्यक्रमात लहानांना घेऊन जावू नये.

सॅनिटायझरच्या वापराऐवजी हात साबणाने स्वच्छ धुणे.  

·         पालकांनी काय काळजी घ्यावी

            पालक बाहेरून आल्याने मुलांना संसर्ग करू शकतात.

बाहेरून आल्यानंतर कपडे बदलून, हात-पाय साबणाने धुतल्यानंतर मुलांना जवळ घ्यावे.

18 वर्षांवरील घरातील सर्व व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे.

स्तनदा माता लस घेऊन बाळाला स्तनपान करु शकतात.

लहान मुलांच्या स्वच्छतेवर अधिक भर द्यावा.

मुलांना सतत घराबाहेर घेऊन जाऊ नये. 

·         हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज कधी भासते?

            मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये लक्षण दिसून येत नाहीत. मात्र इतरांना बाधा होऊ नये, यासाठी घरी आराम करावा. श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हाच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असते. मुलांच्या फुफ्फुसांची तपासणी करून संसर्ग वाढला आहे का, रुग्णाला ऑक्सिजन किंवा औषधांची गरज आहे का, हे डॉक्टर ठरवतात.  

·         लक्षणाप्रमाणे उपचार

            लहान मुलांना कोरोनाच्या लक्षणानुसार उपचार दिले जातात. सौम्य लक्षण असली तर केवळ विलगीकरण करणे, ताप असेल तर पॅरासिटीमॉल गोळ्या दिल्या जातात. या काळात आराम, भरपूर पाणी आणि सकस आहाराची गरज आहे.

मध्यम स्वरूपाची धाप, ताप आणि खोकला ही लक्षणे असल्यास मुलांना दवाखान्यात ॲडमिट करावे लागते. यावेळी सलाईन, ॲन्टीबायोटिक दिली जातात.

तीव्र प्रकारात खूप धाप असेल, धुंदी, झटका, रक्तदाब कमी होणे, संडास आणि ऑक्सिजनची पातळी 90 टक्केच्या खाली गेली असेल तर मुलांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागते. सलाईन, ॲन्टीबायोटिक, ऑक्सिजन, स्टेरॉईड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज मुलांना भासते. शिवाय एनआयव्ही, बायपॅप आणि व्हेन्टिलेटरचाही वापर केला जातो. मात्र पालकांनी घाबरून न जाता, लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत, मात्र अशा सिरीयस केसेस खूपच कमी आहेत, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.  

·         कोरोना झाल्यानंतरही मुलांची काळजी घ्या

            मुलांना कोरोना होऊन गेल्यानंतर तीन ते सहा आठवड्यात मल्टिसिस्टीम इफ्लेमेटरी सिड्रोम इन चिल्ड्रनचा (एमआयएससी) त्रास होतो. यामध्ये अंग, डोळे लाल होतात. रक्तदाब कमी होतो आणि हृदयाला सूज येते. या काळात मुलांना ॲडमिट करून त्वरित उपचाराची गरज असते. स्टेरॉईड, ॲस्पिरीन आणि इमिनोग्लोब्यूलिन या औषधांचा वापर करून रूग्णांवर उपचार केले जातात, असेही त्यांनी सांगितले.  

·         काय काळजी घ्याल…

            तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्याने पालकांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी. कार्यक्रम, गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन जावू नये. लसीकरण करून घ्यावे.

बाहेरून आल्यानंतर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.

मुले जास्त बाहेर जाणार नाहीत, याची खबरदारी घ्या.

घरातील व्यक्तींनी कोरोनाची लक्षण दिसल्यास विलगीकरणात रहावे आणि योग्य निदान करून उपचार घ्यावेत.

मुलांना योग्य आणि सकस आहार द्या. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात धुणे, याबाबत लक्ष द्या.

मुलांना लक्षण दिसल्यास त्वरित तपासणी करून डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. या काळात आहार आणि विश्रांतीवर भर द्या.

लहान मुलांची लस आल्यास लसीकरण करून घेणे, यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होईल, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply