पंढरपुरात मनसेेची अनोखी गणेश सेवा , घराघरात पोच केल्या 9 हजाराहून अधिक गणेश मूर्ती

पंढरपूर/नामदेव लकडे – कोरोनाच्या संकट काळात पंढरपुरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी  यंदा अनोखी गणेश सेवा केली आहे. बाजारातील नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे  यांनी शहर व परिसरातील गणेश भक्तांना स्वखर्चातून  9 हजार 368 गणेश मूर्तीचे घरोघरी जावून मोफत वाटप केले आहे. मनसेच्या या अनोख्या गणेश मूर्ती वाटप उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
यावर्षी कोरोनाच्या सावटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गर्दी बरोबरच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सावावर यंदा बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान घरगुती गणेश उत्सव सर्वत्र  उत्साहात साजरा केला जात आहे.गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात नागरिकांची होणारी  गर्दी कमी करण्यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी शहर व परिसरातील नागरिकांना स्वखर्चातून  मोफत घरपोच गणेश मूर्ती  देणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी असे आवाहन केले होते. मनसेच्या या आवाहनाला गणेश भक्तांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.  दोन दिवसात मनसेच्या सुमारे शंभर  कार्यकर्त्यांनी शहरातील घरोघरी जावून 9 हजार 368 गणेश भक्तांना गणेश मूर्तीचे मोफत वाटप केले.
गणेश मूर्तीचे वाटप करण्यासाठी कार्यकर्त्यांचे दहा गट तयार केले होते. त्यानुसार शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या घरी सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम पाळून कार्यकर्त्यांनी  गणेश मूर्तींचे वाटप केले. गणेश भक्तांनी ही  घरी आलेल्या गणरायांचे भक्ती भावाने स्वागत केले. वाटप केलेल्या  सर्व गणेश मूर्ती या पर्यावरण पूरक असून त्या शाडूमाती पासून  व नैसर्गिक रंगाचा वापर तयार करण्यात आलेल्या आहेत. यावर्षी पंढरपुरात शहरात गणेश मूर्तींची निर्मिती कमी प्रमाणात झाली आहे. 
त्यामुळे उस्मानाबाद, पेण,सोलापूर आदी ठिकाणाहून गणेशमूर्ती आणण्यात आल्या. येथील मनसे कार्यकर्त्यांनी  राबवलेल्या मोफत गणेश मूर्ती उपक्रमाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कौतुक करत सर्व गणेश भक्तांना व कार्यकर्त्यांना गणेश चतुर्शीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली.यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, सागर घोडके, महेश पवार, नागेश इंगोले, प्रताप भोसले,अभिजित डूबल,अवधूत गडकरी,कुणाल पवार, पूजा माळी, रोहन पंढरपूरकर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply