….. तर रेशन होणार बंद !

 रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्यावे


जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन; न केल्यास फेब्रुवारीचे धान्य मिळणार नाही

सोलापूर: जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

            सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनांक 14 डिसेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांचे स्वस्त धान्य दुकानामध्ये आधार व मोबाईल लिंकिंगचे काम सुरू आहे. पुणे विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन लिंकिंगचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेऊन 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार व मोबाईल लिंक करण्याचे आदेश दिले आहेत, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.

            जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेचे 5 लाख 32 हजार 308 कार्डधारक असून त्यापैकी 5 लाख 9 हजार 588 इतक्या कार्डधारकांनी आधार लिंकिंग केले आहे. यामध्ये 22 हजार 720 कार्डधारकांचे आधार लिंकिंग प्रलंबित आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये 25 लाख 39 हजार 736 इतके लाभार्थी असून 19 लाख 22 हजार 288 इतक्या लाभार्थ्यांनी आधार लिंकिंग केले आहे. यामध्ये 6 लाख 17 हजार 448 लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.

Leave a Reply