आमच्यावर उपकार नको, आमचा रोजगार द्या!- कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

 

सोलापुरात २५ हजार कामगारांनी काळे वस्त्र, काळ्या फिती, काळे झेंडे दाखवून केला केंद्र सरकारचा निषेध!

सोलापूर दि.२६:- भारतीय जनता मोठ्या आशेने देशाचा विकास होईल या भ्रमात भाजप सरकारला एकहाती सत्ता दिली. यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन ‘सबका साथ सबका विकास’ हि घोषणा देऊन जनतेची निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रवित्रा घेतला आणि या घटनेला आजमितीस ७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ७ वर्षाच्या कालावधीत आपला देश कॉर्पोरेटस कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा विक्रम मोदी सरकारने केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या  सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित केले. राष्ट्रीय उत्पन्नात घट आणि महागाईत वाढ झाली. खाद्य तेलाचे भाव तिप्पट झालेले आहे. कृत्रिम साठेबाजीला अप्रत्यक्ष खतपाणी घातले जात आहे. भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. कारण कोरोनाचा धोका दिसत असताना सुद्धा या ठोस अमलबजावणी न करता कामात ढिलाई दाखविल्यामुळे आज देश याचे फळ भोगत आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात २६ मे हा दिवस निषेध दिन आणि देशव्यापी काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार केलेला होता. त्या अनुषंगाने सोलापुरातही २५ हजार कामगार काळे वस्त्र, काळे फिती, काळे झेंडे आपल्या घरावर लावून तीव्र निषेध व्यक्त केल्याचे मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. 

बुधवार दि. २६ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारने राबवत असलेले जनता विरोधी प्रतिगामी धोरणांच्या विरोधात देशव्यापी काळा दिवस पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने जिल्हा सचिव कॉ. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगरसेवक कॉ. व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली मोदी सत्तेचा निषेध दिवस पाळण्यात आला. 

यावेळी पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले कि, सोलापूरची परिस्थिती अत्यंत भयावह व बिकट झालेली असून लोक अन्नधान्य, आरोग्य, महागाई आणि महामारीच्या वणव्यात जळत आहेत. याबाबत राज्य शासनाकडे दररोज पत्र व्यवहार, प्रत्यक्ष भ्रमणध्वनी वरून संवाद सुरु आहे. सोलापुरच्या अर्थ व्यवस्थेला गतिमान करणारे दोन चाके विडी व यंत्रमाग उद्योग तातडीने सुरु करा. याबाबत पालकमंत्री यांनी १ जून ला सुरु करण्याचे आश्वासन दिले. तसे न झाल्यास १० हजार विडी व यंत्रमाग कामगारांना घेऊन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा  वज्रनिर्धार कामगारांनी केलेला आहे. हे आंदोलन जर दडपून टाकण्याचा पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाकडून होत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मग आमच्यावर लाठी चालवा, गोळ्या झाडा, तुरुंगात टाका आम्ही मागे हटणार नाही. मायबाप सरकार आमच्यावर उपकार नको तर आम्हाला आमचा रोजगार द्या. आम्ही गुलाम अथवा भिकारी नसून स्वाभिमानाने जगू द्या अशी लोकभावना यावेळी आडम यांनी व्यक्त केले.  

यावेळी निषेध पत्रक दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर नगरसेविका कामिनिताई आडम, नसीमा शेख, सुनंदाताई बल्ला, सलीम मुल्ला, अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, अशोक बल्ला, अकिल शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन कॉ. अनिल वासम यांनी केले.

Leave a Reply