अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच्या आदेशानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

 जिल्हाधिकारी यांचा आदेश संभ्रम निर्माण करणारा बार्शी करांचा सोशल मीडियावर सुर

बार्शी/ प्रतिनिधी- जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सोमवारी संध्याकाळी सोलापूर आयुक्तालय वगळता इतर भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला. जिल्हाधिकारी यांचा आदेश मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात होता. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर नागरिकांमध्ये संभ्रम दिसून आला. व्यापारी नागरिक व दुकानदार या आदेशाबद्दल आपापसात चर्चा करत होते.

या आदेशानंतर नागरिकांमधून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी या आदेशाचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. एका तरुण व्यापाऱ्याने तर जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश नको , आम्हाला विष द्या अशी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर आदेशात दुरुस्ती करावी.जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा. सोशल मीडियावर दिवसभर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत होत्या.

राज्य सरकार लॉक डाऊन करणार नव्हते फक्त शनिवार-रविवार या दोनच दिवस संचारबंदी अपेक्षित होती. परंतु जिल्हाधिकारी सोलापूर यांचा आदेश सरकारी धोरण व जिल्हा स्तरावरील धोरण यात विसंगती दर्शवणारा आहे.लॉकडाऊनमुळे आर्थिक नाड्या बंद होतील. हा आदेश बेरोजगारी, भूकमारी सोबतच महागाईचा भडका उडालेला असताना श्रमिकांना दारिद्रयाच्या खाईत ढकलणारा आहे. जेथे निवडणूका आहेत तिथे लॉक डाऊन नाही हे अजब आहे. कष्टकरी, श्रमिक जनते सोबत छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीने भांडवली व्यवस्थेने टाकलेले हे पाऊल आहे. सरकारने लॉक डाऊन पेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर भर द्यावा. भारतीय कम्युनिस्ट पक्ष लॉकडाऊनचा व सरकारच्या अनागोंदी कारभाराचा तिव्र विरोध करतो. -कॉम्रेड प्रवीण मस्तुद, सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा


मानव हक्क कार्यकर्ते मनिष देशपांडे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश म्हणजे संविधानातील अनुच्छेद 14 कायद्यामधील समानता या तत्त्वाचे उल्लंघन आहे. तसेच निवडणूक असेल तिकडे नियम वेगळे का ? असा प्रश्न माणदेश नगरी सोबत बोलताना उपस्थित केला.

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे अत्यावश्यक सेवेत येणारे दुकाने उघडली होती. परंतु ज्या दुकानांना आस्थापनांना उघडायची परवानगी नाही. त्यांचे मालक व कामगार काहीकाळ बंद दुकाना समोर बसून असल्याचे चित्र होते. मंगळवारी दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. मात्र भाजी मंडई परिसरात नागरिक भाजीपाला आणि फळे खरेदीसाठी आलेले दिसून आले.

Leave a Reply