युती सरकारच्या काळातच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ता स्थापनेचा प्रस्ताव अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट



संजीव कुलकर्णी

नांदेड : राज्यात अस्तित्वात असलेल्या भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासह सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला. २०१९ मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला पण भाजपासोबत आता राहायचे नाही, ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. आपण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वानी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असे चव्हाण यांनी सांगितले.

अशा प्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा, असे मी या नेत्यांना सांगितले होते. परंतु ते पवार साहेबांना पुढे भेटले किंवा नाही याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी होत आहे असे कारण सांगून शिवसेनेत बंड करणारे एकनाथ शिंदे यांना युती सरकारच्या काळात भाजपशी फारकत घ्यायची होती, ही माहिती आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर खळबळजनक आहे. चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपबाबत नेमके काय वाटते हा प्रश्न उपस्थित होणार आहे.

पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे स्वागत

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या सरकारने गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असून मी नांदेड जिल्ह्यात त्यांचे स्वागत करतो. नांदेडच्या विकासाचे प्रश्न नव्या पालकमंत्र्यांनी मार्गी लावावेत, अशी माझी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

Source link

Leave a Reply