महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महिला कौशल्य विकास केंद्र उपयुक्त – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार – महासंवाद


नागपूर, दि. 5 :  महिलांच्या सुप्त गुणांचा विकास करुन त्यांना रोजगारक्षम बनविणे हाच महिला कौशल्य विकास केंद्राचा मुख्य उद्देश आहे. यातून त्यांची सर्वांगीण उन्नती होऊन त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी येथे केले.

मोहपा नगर परिषदेअंतर्गत महिला कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले असून त्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व केंद्राचे उद‌्घाटन श्री. केदार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा शोभा कऊटकर, उपाध्यक्ष पंजाब चापके, कळमेश्वर पंचायत समितीचे सभापती श्रावण भिंगारे, उपासभापती जयश्री वाळके, बाबाराव पाटील, उज्वला बोंढारे, मनोहर कुंभारे, मुख्याधिकारी साधना पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

महिलांनी सावित्रीच्या विचारांना आत्मसात करुन आपला विकास साधावा. यासाठी विचारांची देवाण-घेवाण महत्वाची असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले. आज मोहपात झालेल्या विविध विकासकामांच्या भूमीपूजनातून नगरीचा चौफेर विकास होईल. शैक्षणिक आलेख वाढावा यासाठी शहरात स्टडी सर्कलच्या निर्मितीसाठी मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा. त्यास निधी उपलब्ध करुन दिला जाईल. विकासात्मक कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिला केंद्रात विविध कौशल्यविकास प्रशिक्षणाचे आयोजन करुन ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती मजबूत करावी. या केंद्राच्या माध्यमातून स्थापित होणाऱ्या उद्योगांसाठी बाजारपेठ व आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

समाजास अभिप्रेत असलेले काम करुन या उपक्रमास यशस्वी करण्याची जबाबदारी महिलांची आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी माहिला कौशल्य विकास केंद्राच्या रुपाने जिल्ह्यात प्रायोगिक तत्त‌्वावर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. मुंबई, पुणे व ठाणे येथील यशस्वी उद्योजकांमार्फत या केंद्रात महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोराना काळात विकासाची गती मंदावली होती. आता घरकुलासंबंधी प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी फळबागवर आधारित टेक्नालॉजी व प्रशिक्षणाबाबत आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षाचा नगर परिषदेचा आढावा प्रास्ताविकात शोभा कऊटकर यांनी सादर केला. तसेच महिला कौशल्य विकास केंद्राच्या उद्देशाबाबतची माहिती त्यांनी यावेळी विशद केली. स्टडी सर्कलसाठी निधी, महात्मा फुले वाचनालयासाठी जागा, दलीत वस्त्यांमध्ये संविधान भवन, मोहपा येथे ग्रामीण रुग्णालय, तसेच केंद्रासाठी संगणक, बुक केसेस देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. महिलांना रोजगारक्षम बनविण्यासाठी हे केंद्र फायदेशिर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी  नगरपरिषदेच्या वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत हिंदू स्मशानभूमीच्या बांधकाम, नदीच्या काठावर संरक्षण भिंतीचे बांधकाम, जिल्हा क्रीडा राजीव गांधी संकुलामध्ये धावपट्टी, दलीतवस्ती सुधारयोजनेंतर्गत सिमेंट रस्ता, संत सावता मंदीर प्रदक्षिणा मार्गाचे बांधकाम, लोहागड नाल्याचे पाणी मधुगंगा जलाशयात वळविण्याचे काम, डॉ. आंबेडकर समाजभवनाचे विस्तारीकरण व डायनिंग हॉलचे बांधकाम, सुसज्ज अभ्यासिका आदी विकासकामांचे भूमीपूजन मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

खापा येथील रस्त्याचे भूमीपूजन, नगरपरिषद  कार्यालयाचे नुतनीकरण व आंतरिक सौंदर्यीकरण तसेच एलिवेशन कामाचे भूमीपजून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाचे सौदर्यीकरण व परिसर विकास कामाचे भूमीपूजन तसेच लाभार्थ्यांना जमीनीचे पट्टे वाटप श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

Source link

Leave a Reply