…तर कदाचित समजलच नसतं की यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? – सुषमा अंधारेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा! | Sushma Andhare criticizes MLA Abdul Sattar msr 87राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्तारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी असा अल्टिमेटम दिला आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सत्तारांच्या या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचीही यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “काल ज्याप्रकारे अब्दुल सत्तारांनी अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने विधान केलं आणि हे जर ऑनएअर सुरू नसतं तर कदाचित समजलच नसतं की यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? यांची मानसिकता काय आहे. थेट प्रसारण सुरू असल्याने ते कटही करता आलं नाही. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की हे किती गलिच्छ आणि विकृत मानसिकतेचे लोक आहेत. महिलांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन किती वाईट आहे. ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार बोलले, त्यानंतरही सत्तेचा केवढा माज म्हणावा की सत्तार असतील किंवा गुलाबराव पाटील असतील, यांनी थेट माफी मागणं टाळलं.”

हेही वाचा – … तेव्हा शिंदे गट आणि भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली – सुषमा अंधारेंचं विधान!

याचबरोर सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका करताना म्हटले की, “भाजपाच्या आश्रयाला गेलेले लोक जे शिंदे गटातील आहेत, वाण नाही पण गुण लागला अशी ज्यांची अवस्था झालेली आहे. जे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार समजतात, ते बाळासाहेबांचे वारसदार असू शकत नाहीत.”

“अब्दुल सत्तारांवर कारवाईसाठी दाखवलेली तत्परता गुलाबराव पाटलांच्या वेळी का नाही?”; सुषमा अंधारे यांचा महिला आयोगाला सवाल!

याशिवाय “संसदेच्या सदस्य असलेल्या आणि सातत्याने ‘संसद रत्न’ किताब मिळवत असलेल्या सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तारांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. अब्दुल सत्तारांवर कारवाई झाली पाहिजे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार सातत्याने महिला राजकारण्यांवर ठरवून टीका करत आहेत. त्यांच्यावर आता कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्तारांनी आता राजीनामा दिला पाहिजे.” असं काल सुषमा अंधारेंनी म्हटलं होतं.Source link

Leave a Reply