पश्चिम वऱ्हाडात ३३ टक्के शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा



प्रबोध देशपांडे

अकोला : पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष कायम असून त्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना पश्चिम वऱ्हाडातील सरासरी ३३ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षा लागली आहे. विविध कागदपत्रांच्या नावावर शेतकऱ्यांची अडवणूक होते. या प्रकारामुळे शेतकरी सावकारी कर्जाच्या चक्रात अडकण्याची भीती व्यक्त केली जाते.

शेतकरी व बँकांच्या दृष्टीने पीक कर्ज वाटप कायम अडचणीचे असते. यंदाही तो कित्ता कायम आहे. खरीप हंगाम निघून जातो, तरी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य होत नाही. खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यात दरवर्षी जिल्हानिहाय पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात येते. कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवण्यात येतात. मात्र प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती होत नाही. शेतकऱ्यांना विविध कारणांवरून कर्जासाठी अपात्र ठरवण्याचे प्रमाण मोठे आहे. खरीप हंगामाच्या नियोजनासह पेरणीसाठी पीक कर्जाचा आधार मिळण्याच्या आशेवर शेतकरी वर्ग बँकांमध्ये गर्दी करतो. एकीकडे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा खडाटोप सुरू असतो, तर दुसरीकडे शेतकरी पात्र ठरत नसल्याने उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे बँका कारण पुढे करतात. गेल्या वर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टच कमी करण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये ३०-३५ टक्के, तर काही ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट घटवण्यात आले. तरीदेखील उद्दिष्टानुसार १०० टक्के पीक कर्ज वाटप झाले नाही.

यंदा दरवर्षीप्रमाणे १ एप्रिलपासून पीक कर्जाचे वाटप सुरू झाले. पश्चिम वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी एक हजार २३७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९७ कोटीने उद्दिष्ट वाढविण्यात आले. आतापर्यंत ६७.६८ टक्के कर्ज वितरित झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची गती वाढल्याचे दिसून येते. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी एक लाख ४० हजार शेतकऱ्यांसाठी एक हजार ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यंदा उद्दिष्टात १०० कोटीने वाढ करण्यात आली. आतापर्यंत ९० हजार ४९५ शेतकऱ्यांना ९२० कोटींचे कर्ज देण्यात आले. वाटपासाठी ठरवल्यापैकी ६७ टक्के शेतकऱ्यांना, तर उद्दिष्ट रक्कमेच्या ६६ टक्के कर्ज वाटप झाले. वाशीम जिल्ह्यात गेल्या वर्षी पीक कर्ज वाटपाचे एक हजार ०२५ उद्दिष्ट करण्यात आले होते. मागील वर्षी वाशीम जिल्ह्यात बँकांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्ज वाटप केल्याने या वर्षी सुरुवातीला एक हजार १५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यामध्ये आणखी १३० कोटींनी वाढ केली. त्यामुळे आता एक हजार २८० कोटी रुपये एक लाख २० हजार शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले. ४ जुलैपर्यत ९२ हजार ५५ शेतकऱ्यांना ८४५ कोटी ८८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. कर्ज वाटपाची टक्केवारी ६६ टक्के आहे. वाशीम जिल्ह्यातही या वर्षी सुरुवातीला वेगाने कर्ज वाटप झाले. मात्र नंतरच्या कालावधीत पीक कर्ज वाटपाची गती मंदावली आहे.

उद्दिष्टपूर्तीचे आव्हान

१ एप्रिल ते ३१ ऑगस्टपर्यंत खरीप हंगामात कर्ज वाटप होते. शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कर्जाची गरज असते. मात्र शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून कर्जासाठी ताटकळत ठेवले जाते. आता खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात पीक कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती करण्याचे बँकांपुढे आव्हान आहे. त्यानंतर १ सप्टेंबरपासून रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप होईल. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामासाठी विविध जिल्ह्यांमध्ये अतिशय अल्प उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामात पात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी असते.

Source link

Leave a Reply