Video: विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच आदित्य ठाकरे त्याला म्हणाले, “एवढे जवळचे असून…” | Aditya Thackery Meets Magathane Shivsena rebel mla prakash surve who is with eknath shinde says i feel sad for what you have done scsg 91



शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदारांमध्ये आज सकाळी आणखी एका आमदाराची भर पडली. उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ च्या फरकाने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहाबाहेर पडताना शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंची भेट सभागृहाच्या दाराशी एका बंडखोर आमदारासोबत झाली. यावेळी दोघांमध्येही प्रसारमाध्यमांसमोरच संवाद झाला.

नक्की वाचा >> विश्वास दर्शक ठराव : १६४ विरुद्ध ९९… त्या काँग्रेस आमदारांनी शिंदे सरकारला ‘केली मदत’; फडणवीसांनी भाषणात मानले आभार

झालं असं की, आदित्य सभागृहाबाहेर पडत असताना त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटले. यावेळी आदित्य यांच्या आजूबाजूला प्रसारमाध्यमांचा गराडा होता. मात्र आदित्य यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत थेट सुर्वेंना भेटले. यावेळी आदित्य ठाकरे सुर्वे यांना, “एवढे जवळचे असून… काय सांगणार आपण मतदारसंघाला? तुम्ही असं कराल असं केव्हाच वाटलं नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होतं हे तुम्हाला पण माहितीय. मला स्वत:ला याच दुःख झालं हे तुम्हाला पण माहितीय,” असं म्हटलं.

आदित्य आणि सुर्वे यांची ही भेट अवघ्या १२ ते १५ सेकंदांची होती. आदित्य हे सारं बोलत असताना सुर्वे मात्र समोर उभं राहून मान हलवत त्यांच्या बोलण्याला होकार असल्याचं दर्शवत होते. सुर्वे यांनी यावेळी तोंडातून एकही शब्द काढला नाही. नंतर आदित्य पुढे प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी पोडियमकडे निघून गेले. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभेतील शिवसेनेचे आमदार आहेत. शिंदे गटासोबत बंड पुकारणाऱ्या ४० आमदारांपैकी ते एक आहेत.

नक्की पाहा >> Photos: कट्टर शिवसैनिक ते ४० दिवसांचा तुरुंगवास; फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक करताना विधानसभेत मांडलेले १० मुद्दे

विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आणि शिंदे सरकारविरोधातील विश्वास दर्शक ठराव या दोन्ही वेळेस ज्यांनी व्हिपचं उल्लंघन केलंय त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की आहे असं, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. शिवसेनेच्या व्हीपवरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने असून प्रकरण सर्वोच्च न्यायलयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे. ११ जून रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य यांनी थेट पत्रकारांसमोर बोलताना मुख्यमंत्री समर्थक शिंदे गटाच्या आमदारांना व्हीपवरुन इशारा दिला.

नक्की वाचा >> “स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या राज्यपालांपैकी हा एक नंबरचा बोगस राज्यपाल”; कोश्यारींना अपक्ष आमदाराने केलं लक्ष्य

यावेळी बोलताना आदित्य यांनी, “शिवसेना कधीच संपणार नाही,” असंही सांगितलं. तसेच, “२० मे रोजी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होतं,” असा खुलासाही आदित्य यांनी केला. मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. यापूर्वी कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अशाच पद्धतीची शक्यता व्यक्त केली होती.



Source link

Leave a Reply