Headlines

विदर्भाला अतिवृष्टीचा दुसऱ्यांदा फटका ; १० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान

[ad_1]

अमरावती : विदर्भात जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा बसला. परिणामी, १० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात नुकसान झाले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. कापूस आणि सोयाबीनचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जुलैत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख ९५ हजार हेक्टरमधील शेतजमिनीचे नुकसान झाले. पिके जवळपास नष्ट झाली. आता नव्याने झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीचे क्षेत्र  वाढणार आहे. सोयाबीन, कापूस, तुरीसह मूग आणि उडीद प्रभावित झाले आहे. बाधित झालेल्या या क्षेत्रात पुन्हा पेरणीची शक्यता मावळली असून बहुतांश पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला आहे. अतिपावसामुळे कोवळी पिके चिखलात बुडाली आहेत.

जुलै महिन्यात नागपूर विभागातील ६२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. सुमारे ५ लाख २५ हजार शेतकऱ्यांचे ४ लाख ७७ हजार हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाले. आता गेल्या तीन दिवसांमध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. अमरावती विभागात जुलैमध्ये ५ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रात पिकांची हानी झाली होती. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते, पण गेल्या तीन दिवसांमध्ये वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यानेही अतिवृष्टी अनुभवली. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी शासनाकडून कोरडवाहू शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये, बागायती शेतकऱ्याला १३ हजार  २०० तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत दिली जाते. अंतिम अहवाल अद्याप तयार व्हायचा आहे.

विदर्भात ११ जण वाहून गेले

नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे हाहाकार माजला आहे. काही जिल्ह्यात पूरस्थितीमुळे अनेक मार्ग बंद आहेत. काही ठिकाणी पावसामुळे रस्ते खचले आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेंबळा नदीत ट्रॅक्टरसह पाच जण वाहून गेले. यातील तीन जणांना वाचवण्यात यश आले, तर दोघे अजूनही बेपत्ता आहेत. विदर्भात या पावसामुळे एकूण ११ जण वाहून गेले आहेत.  अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण येथून वाहणाऱ्या बेंबळा नदीला पूर आला. पाच जण ट्रॅक्टरवर असतानाही चालकाने ट्रॅक्टर पुलावरून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. पाचपैकी दोघांनी तात्काळ पोहून किनारा गाठला तर एका व्यक्तीने संपूर्ण रात्र झाडावर काढून जीव वाचवला. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच असून आता नव्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतपिकांची हानी झाली आहे. त्याचेही पंचनामे केले जाणार आहेत. नुकसानीचा अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे. अमरावती विभागात सुमारे ५.५० लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. – किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *