Headlines

वडाळी तलाव, शिवटेकडी विकासासाठी निधी मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

[ad_1]

अमरावती, दि. 13 : अमरावती शहरातील शिवटेकडी, वडाळी तलाव यांच्या विकास व सुशोभीकरण, तसेच जिल्ह्यातील केकतपूर, शेवती, संगमेश्वर आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार ही कामे लवकरच पूर्णत्वास जातील व पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे व पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत मंत्रालय स्तरावर बैठक झाली. या बैठकीला अमरावती येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे महापौर चेतन गावंडे, जिल्‍हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर, गटनेता दिनेश बूब, नगरसेवक सुनिल काळे, तांत्रिक सल्‍लागार जीवन सदार, सिस्‍टीम मॅनेजर अमित डोंगरे, उपअभियंता प्रमोद कुळकर्णी उपस्थित होते.

अमरावती शहरात वडाळी येथे ब्रिटीशकालीन तलाव असून, त्याठिकाणी उद्यानही विकसित आहे. लगतच बांबू गार्डन हे पर्यटनस्थळ विकसित आहे. वडाळी तलावाचे क्षेत्रफळ २०९९५५ चौ.मी. (२०.९० हे.आर.) तसेच त्‍यालगत स्‍व.श्री.हरिभाऊ कलोती उद्यान याचे क्षेत्रफळ ३२७०० चौ.मी. (३.२७ हे.आर.) आहे. याठिकाणी सुनियोजनबद्ध विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली.

शहराच्‍या मध्यवस्‍तीत शिवटेकडी असून त्‍याठिकाणी शिवसृष्‍टीची उभारणी करण्‍याबाबत नियोजित आहे. त्याबाबत अहवालही पर्यटन विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला असून, तीन कोटी रूपये निधीची मान्यता प्राप्त आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० लाख निधी प्राप्त झाला. उर्वरित निधी मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

                        निधी मिळवून देऊ : पर्यटन मंत्री

विविध महत्वाच्या स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यातील केकतपूर व शेवती येथील पर्यटन विकासकामांसाठी 10 कोटी, संगमेश्वर येथील पर्यटन विकासासाठी 5 कोटी, याबरोबरच धामोरी येथील कामांचा उर्वरित निधी मिळावा. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भपीठ, धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिर संस्थान, नांदगाव पेठ येथील शारदुल बाबा दर्गा आदी ठिकाणी पर्यटन विकासासाठी निधी व प्रादेशिक पर्यटन योजनेत अंतर्भूत अचलपूरमधील सरायपुरा येथील कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली.

त्याचप्रमाणे, एस.आर.पी.कॅम्‍प, वनविभाग व महापालिका यांच्‍या जमिनी व नैसर्गिक संसाधने परिपूर्ण असलेले दोन तलाव व नैसर्गिक सौंदर्य लाभलेला भूभाग म्‍हणून याठिकाणी महापालिकेकडून पर्यटन उद्यान निर्माण करून, उद्यानाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान असे नाव देण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या उद्यानासाठी निधी अप्राप्‍त असून, तो लवकर मिळण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. या सर्व मागण्या लक्षात घेऊन आवश्यक तो सर्व निधी मिळवून दिला जाईल, असे पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी आश्वासित केले.

महत्वाच्या ठिकाणांची जपणूक, संवर्धन, सौंदर्यीकरण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून, अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत पर्यटन मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्यामुळे लवकरच ही कामे गती घेतील, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

०००

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *