Headlines

उन्हाळय़ात वणवण, पावसाळय़ात गढूळ पाणी..; मेळघाटातील शोकांतिका

[ad_1]

मोहन अटाळकर

अमरावती : मेळघाटातील पाचडोंगरी आणि कोयलारी या गावांमध्ये जलजन्य आजारामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी धावपळ चालवली असली, तरी दूषित पाण्याचा प्रश्न मेळघाटसाठी नवीन नाही. उन्हाळय़ात पाण्यासाठी वणवण आणि पावसाळय़ात गढूळ पाणी पिण्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय नाही. मेळघाटातील अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत.

चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी ही गावे मध्य प्रदेशच्या सीमेवर तालुक्याच्या मुख्यालयापासून ६० तर अमरावतीपासून १२० किलोमीटर अंतरावर. या दुर्गम गावांमध्ये पोहचायला साडेतीन तास लागतात. कोयलारी व पाचडोंगरी गट ग्रामपंचायत आहे. कोयलारीतील एका विहिरीतून या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळय़ात दूषित झालेले पाणी शुद्धीकरण न करता पिण्यासाठी वापरल्याने जलजन्य आजाराचा फैलाव झपाटय़ाने झाला आणि चार गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले. सुमारे अडीचशेच्या वर लोकांना बाधा झाली आणि त्यांच्यावर उपचार करावे लागले. अनेक रुग्णांमध्ये पटकीची (कॉलरा) लक्षणे आढळून आली आहेत.

याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामसेवकाला तत्काळ निलंबित केले तर विस्तार अधिकाऱ्याला नोटीस देण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चोवीस तासांच्या आत स्पष्टीकरण मागविण्यात आले. तसेच कोयलारीच्या सरपंचांना ३९ (१) अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली. आता आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे घरोघरी पाण्याचे शुद्धीकरण, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींवर औषधोपचार, विहिरीच्या पाण्याचे शुद्धीकरण व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पण, वेळीच उपाययोजना करण्यात आल्या असत्या, तर उद्रेक टाळता आला असता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मेळघाटातील अनेक गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, जलजीवन मिशन, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्या, तरी उन्हाळय़ात वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, स्रोत कोरडे पडणे यामुळे या योजना बंद पडतात. आदिवासी गावकऱ्यांची त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू होते. नाइलाजाने आदिवासींना झरे किंवा नाल्याचे दूषित पाणी प्यावे लागते. यामुळे अतिसार आणि इतर जलजन्य आजारांची लागण होते. यंदा चिखलदरा तालुक्यातील ११ गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले.

चिखलदरा तालुक्यातील सोनापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी २०१५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ३९.५२ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. पण, दरवर्षी उन्हाळय़ात उद्भवातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होते. २०१८ मध्ये चाळीसच्या वर गावकऱ्यांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली होती. धारणी तालुक्यातील तातरा या गावातील पाणीपुरवठा करणारी कूपनलिका गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. गावकऱ्यांना त्यामुळे विहिरीतील गढूळ पाणी प्यावे लागत आहे. अशी स्थिती मेळघाटातील अनेक गावांमध्ये आहे.

दूषित पाणी प्याल्याने गॅस्ट्रो, अतिसार, विषमज्वर (टायफाईड), पटकी (कॉलरा) यासारख्या आजारांचा फैलाव होतो. एकाच दूषित स्रोतांमधून गावाला पाणीपुरवठा झाल्यास आजाराचा उद्रेक होतो.  शुद्ध पाणीपुरवठय़ाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. आरोग्यसेवकांनी आपल्या गावातील पिण्याचे पाण्याच्या स्रोतांच्या याद्या करून पावसाळय़ात दरमहा व इतर काळात तिमाहीत एक वेळा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावे लागतात. त्यासाठी मेळघाटात धारणी, चुरणी व चिखलदरा येथे पाणी तपासणी प्रयोगशाळा आहेत. पाणी नमुना अशुद्ध आल्यास ग्रामपंचायतीला नोटीस द्यावी लागते, पण या यंत्रणेतील दुर्लक्षामुळे दूषित पाणीपुरवठा होतो, असे निदर्शनास आले आहे.

दुसरीकडे, जलजन्य आजाराचे संनियंत्रण नियमित स्वरूपात राज्य स्तरावरून करण्यात येते. जिल्हा पातळीवरून अहवाल सादर केले जातात आणि उद्रेकग्रस्त भागात क्षेत्रीय भेटी आणि मार्गदर्शन करण्यात येते. जलजन्य आजाराचे नियमित रुग्ण सर्वेक्षण, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमार्फत पाणी गुणवत्ता संनियंत्रण, आरोग्य कर्मचारी व जलसुरक्षा रक्षकांचे पाणी शुद्धीकरणासाठी प्रशिक्षण, द्विवार्षिक स्वच्छता सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण, अशा उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असले, तरी यात साखळीची एक कडी जरी तुटली, तरी त्याचे भयंकर दुष्परिणाम समोर येतात, हे ताज्या घटनांमधून समोर आले आहे.

पाचडोंगरी व कोयलारी गावातील रुग्णांमध्ये दूषित पाण्यामुळे ज्याप्रमाणे लक्षणे समोर आली, तशीच लक्षणे आढळलेले काही रुग्ण काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत काही गावांमध्ये समोर आले आहे. या गावांतील काही रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. सध्या या परिसरातील स्थिती नियंत्रणात आहे. रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 -डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *