‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा – पालकमंत्री सतेज पाटील


कोल्हापूर दि. 31 :- केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पर्यटन संचालनालयाच्या (पुणे) उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार, भारत पर्यटन विभागाचे सहायक निर्देशक जितेंद्र जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत. राजर्षी शाहू महोत्सव व दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करा. केंद्र शासनाच्या पर्यटनच्या जवळपास 25 योजना असून यापैकी किमान 5 योजनांचा प्रस्ताव सादर करावा. पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून पर्यटनाच्या प्रसिध्दीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यासाठी सोशल मीडियामध्ये तज्‌ज्ञ असलेल्या व्यक्तींची नेमणूक करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित मुठ बांधुया व केंद्राच्या योजनांचा उपयोग पर्यटन विकासासाठी होवू शकतो याचा सर्वंकष प्रस्ताव तयार करा. तसेच जिल्ह्यातील पर्यटनाचा समावेश असलेली दिनदर्शिक काढावी. यामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीने वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पर्यटनावर आधारित दिनदर्शिका काढण्यात येत असून त्याचेही लवकरच प्रकाशन करण्यात येईल.

भारत पर्यटनचे सहायक निर्देशक जितेंद्र जाधव यांनी केंद्र शासनाच्या पर्यटन विषयक योजनांची तर पर्यटन संचालनालयाच्या (पुणे) उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी राज्याच्या पर्यटन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

0 0 0

Source link

Leave a Reply