Headlines

उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी आणखी दोघांना अटक

[ad_1]

अमरावती : येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने बुधवारी आणखी दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे.

मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (४१, रा. ट्रान्सपोर्ट नगर) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (२३, लालखडी), अशी आरोपींची नावे आहेत. हत्याप्रकरणी निधी संकलन करणे आणि इतर आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ‘एनआयए’च्या पथकाने चौकशी सुरू केली असून आरोपींच्या घराची झडती घेतली जाण्याची शक्यता आहे.

उमेश कोल्हे यांची गेल्या २१ जूनच्या रात्री गळा चिरून हत्या झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दुसऱ्या दिवशी दोन आणि त्यानंतर अन्य पाच आरोपींना अटक केली. यानंतर  या घटनेचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला होता.

पोलिसांनी यापूर्वी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) या आरोपींना अटक केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास  ‘एनआयए’ करीत असून अमरावती पोलीस त्यांना तपासात सहकार्य करीत आहे. हत्येचा कट रचणे, आरोपींचा इतर संघटनांशी तसेच आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी तपास करण्यात येत आहे. अजूनही एक आरोपी पसार आहे. त्याचा शोध घेणे तसेच तपासाच्या अनुषंगाने ‘एनआयए’ अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या शहरात दाखल झाले आहे. या पथकाने मंगळवारी आणि बुधवारी गुन्ह्यासंदर्भात तपास केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोल्हे यांनी नूपूर शर्माच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारित केल्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचे समोर आले होते. त्यामुळेच प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे गेला. त्यानंतर ‘एनआयए’ने सातही आरोपी ताब्यात घेऊन त्यांना ४ जुलै २०२२ ला मुंबईत नेले. दरम्यान, सध्या सातही आरोपींची मुंबईच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून समोर आलेल्या माहितीच्या आधारे तपासाशी संबंधित आणखी काही माहिती घेण्यासाठी ‘एनआयए’चे पथक सध्या शहरात आल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *