Headlines

उमेश कोल्हे हत्याकांड : सातही आरोपींविरुद्ध “यूएपीए”न्वये गुन्हे

[ad_1]

अमरावती : येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांन्वये (यूएपीए) देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर कोतवाली पोलिसांनी सोमवारी या हत्याकांडातील सर्व आरोपींविरोधात ‘युएपीए’ अंतर्गत कलमे जोडली. त्यात कलम १६, १८ आणि २० चा समावेश आहे. लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याने  हत्येच्या गुन्ह्यासोबतच ‘यूएपीए’ अंतर्गत ही कलमे जोडण्यात आली आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सात आरोपींपैकी अतीब रशीद याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चार आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज सोमवारी संपली. ‘एनआयए’ त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. सहावा आरोपी डॉ. युसूफ खान हा पोलीस कोठडीत असून या प्रकरणातील सूत्रधार आरोपी इरफान खान याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून काढू- डॉ. अनिल बोंडे

 उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्येमुळे अमरावती जिल्ह्यातील जनमानस दु:खी असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारची दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी कठोर उपायांची गरज आहे. केंद्रातील भाजप सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेची दखल घेतली आहे. या गुन्ह्याची पाळेमुळे शोधून काढू आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर‍ शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करू, असे भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

डॉ. बोंडे म्हणाले, भाजपतर्फे येथील राजकमल चौकात उमेश कोल्हे हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शांततेत हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. कोल्हे कुटुंबीयांच्या आम्ही पाठिशी आहोत, हे सर्व लोकांनी दाखवून दिले. दहशतवादावर अंकूश निर्माण व्हावा, अमरावती भयमुक्त रहावी, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *