Headlines

उदगीर शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समन्वय समितीची स्थापना होणार – राज्यमंत्री संजय बनसोडे


लातूर दि.25 ( जिमाका ) – उदगीर शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ समन्वय समिती स्थापन करून त्याद्वारे वाहतुकीची समस्या दूर केली जाईल, यासाठी परिवहन विभागाचे पथक आठवड्यातून दोन दिवस उदगीर शहरात येणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

उदगीर येथे रस्ते वाहतूकीच्या बैठकित राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, बसवराज पाटील नागराळकर,माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, रमेश अंबरखाने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यांची उपस्थिती होती.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी मूळ रस्ते चांगले असले पाहिजे,त्यादृष्टीने शहरातील रस्त्यांच्या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून या सर्व रस्त्यांची कामे सुरू आहेत.रेल्वे ब्रीज साठी३५कोटींचा निधी मंजूर झाला असून या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे.ही कामे संपताच वाहतुकीची समस्या दूर होण्यास वेळ लागणार नसल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी केले.

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी केले तर सचिव प्रा. एस. एस. पाटील यांनी उदगीर शहरातील वाहतूकी संदर्भात मनोगत व्यक्त केले.

शहरातील वाहतूकीची समस्या दूर करण्यासाठी जे साधने लागतील ते नियोजन समितीकडून तात्काळ मंजूर करून घेण्यात येतील. शिवाय ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करून त्याद्वारे वाहतूकीची कोंडी दूर करण्यात येईल .याची सुरुवात लगेच करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले.

उदगीर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर पिवळे पट्टे मारले,यात सुसूत्रता आणण्यासाठी वॉकी टॉकी ची यंत्रणा सुरू केली. नवीन पोलीस गाड्या देवून चार्ली सिस्टम सुरू केली. यापुढे रस्त्यावर थांबून वाहतुकीची कोंडी निर्माण करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी यावेळी सांगितले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार यांनी परिवहन विभागाचे पथक आठवड्यातून दोन दिवस उदगीर शहरात येवून काम करेल,शहरी व ग्रामीण ऑटोच्या नोंदी ठेवून त्यांना परवाना दिला जाईल. अन्य वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत यासाठी पोलिसांची मदत घेवून उदगीर शहरातील वाहतूक समस्या दूर केली जाणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी भारत राठोड यांनी पालिकेच्या वतीने ही समस्या दूर करण्यासाठी लगेच काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चासत्रात मोतीलाल डोईजोडे,बाबुराव पांढरे,सुरेश पाटील नेत्रगावकर,व्ही. एस. कुलकर्णी, युवराज धोतरे, विनायक चाकूरे, राम मोतीपवळे, बबन कांबळे यांनी सहभाग घेतला होता.मान्यवरांच्या हस्ते वाहतुकीचे नियमावली च्या पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण जाहुरे व माधव खताळ यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दत्ताहरी होनराव यांनी केले.

Source link

Leave a Reply